अण्णा द्रमुक उघडणार भाजपला दक्षिणेचे दार?

bjp
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून आणि अमित शहा हे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाल्यापासून भाजप विजयाच्या मार्गावर घोडदौड करत होता. काश्मीरपासून कर्नाटकापर्यंत पक्षाला यश मिळत होते. अगदी केरळसारख्या कट्टर साम्यवादी राज्यामध्येही भाजपला विधानसभेत एक जागा मिळाली. मात्र तमिळनाडू हे राज्य याला अपवाद होते. भाजपच्या दक्षिण दिग्विजयात हे राज्य एक अडथळा बनून उभे होते. यापूर्वी अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांशी युती करून भाजपने यशाची चव चाखली होती. मात्र आधी जयललिता आणि नंतर करुणानिधी यांच्या निधनानंतर तमिळनाडूत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यामध्ये उत्तर भारतीय पक्ष अशी प्रतिमा असलेल्या भाजपला पाय ठेवायला जमिनीची गरज होती.

दुसरीकडे जयललिता यांच्यासारख्या भक्कम नेतृत्वाचा अस्त झाल्यानंतर सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षालाही नेतृत्वाचा अभाव जाणवत आहे. सध्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वबळावर पक्षाला सत्तेपर्यंत नेऊ शकत नाही, हे त्यांनाही माहीत आहे. त्यामुळे त्यांनाही आधाराची गरज आहे.

बहुधा या गरजेपोटीच हे दोन्ही पक्ष जवळ येत असून त्यांची युती होण्याची दाट शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत युतीच्या दृष्टीने भाजप आणि अण्णा द्रमुक पक्षात अनौपचारिक चर्चा सुरू होती. गुरुवारी या चर्चेला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अण्णा द्रमुकचे ज्येष्ठ मंत्री थंगमणी आणि एसपी वेलुमानी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. गोयल यांच्याकडे तमिळनाडुमधील भाजपची जबाबदारी आहे. ही चर्चा सुमारे तीन तास चालली. त्यानंतर या युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले आणि येत्या मंगळवारी तिची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. युतीसंबंधातील ही चर्चा अत्यंत प्राथमिक पातळीवर असून निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर स्पष्ट चित्र समोर येईल, असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

पट्टाळी मक्कळ काट्चि हा पक्षही या युतीत दाखल होईल, असा विश्वास भाजप आणि अण्णा द्रमुक या दोन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर विजयकांत यांच्या नेतृत्वाखालील डीएमडीके, जी. के. वासन यांच्या नेतृत्वाखालील तमिळ मनिला काँग्रेस आणि अन्य दोन प्रादेशिक पक्षही या आघाडीत सामील होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी एक मार्च रोजी कन्याकुमारी येथे सभा घेणार आहेत. त्यावेळी हे सर्व आघाडीचे नेते त्यांच्यासोबत व्यासपीठावर उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.

तमिळनाडूत भाजपने आठ लोकसभा मतदारसंघांची मागणी केली आहे. या संख्येबाबत अण्णा द्रमुकला कुठलाही आक्षेप नाही. अण्णा द्रमुकची हरकत आहे ती प्रत्यक्ष मतदार संघांना! कारण भाजपने मागितलेल्या बहुतेक जागा या कोंगु प्रदेशात येतात आणि हा प्रदेश दिवंगत नेते व अण्णा द्रमुकचे संस्थापक एम. जी. रामचंद्रन यांच्या काळापासून पक्षाचा गड समजला जातो.

खरे तर भाजप आणि अण्णा द्रमुकमधील हे हितगुज लपून राहिलेले नाही. विरोधी पक्ष असलेल्या द्रमुक आणि काँग्रेसने त्यावर वारंवार टीकाही केली आहे. भाजप अण्णा द्रमुकला ही युती करण्यासाठी भाग पाडत आहे, असा या पक्षांचा आक्षेप हे. त्यासाठी तामिळनाडूच्या मंत्र्यांच्या घरावर तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सीबीआय आणि प्राप्तिकर खात्याकडून टाकण्यात आलेले छाप्यांचा दाखला दिला जातो. अशाप्रकारे दबाव टाकून अण्णा द्रमुकला आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचे प्रयत्न भाजप करत आहे. अण्णा द्रमुक तेही अनेक प्रकरणांमध्ये दगडाखाली हात सापडल्या असल्यामुळे हा पक्ष भाजपसमोर शरणागती पत्करत आहे, असे या पक्षांचे म्हणणे होते.

असे नसते तर तमिळनाडूमध्ये अत्यंत नगण्य असलेल्या भाजपशी जवळीक वाढविण्यासाठी अण्णा द्रमुक ने एवढी धडपड कशाला केली असती, असा प्रश्न ज्येष्ठ कॉंग्रेस नेते तिरुची वेलुसामी यांनी केला.

असे असले तरी भाजपच्या दृष्टीने अण्णा द्रमुकला सोबत घेणे आवश्यक आहे. ही युती झाली तर आम्हाला तमिळनाडू आणि पुदुच्चेरीतील 40 पैकी 30 जागा मिळतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांनी नोव्हेंबर महिन्यात टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला होता. सुपरस्टार रजनीकांत यांना राजकारणात आणून यश मिळविण्याचे बेत भाजपने आखले होते. मात्र रजनीकांत यांचा इरादा अद्यापही स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे अण्णा द्रमुक हाच भाजपसमोरचा एकमेव पर्याय उरला आहे.

Leave a Comment