अफगाण युद्धातील दहशतवादी अब्दुल रशीद गाझी पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड

azhar-masood
नवी दिल्ली – अफगाण युद्धातील दहशतवादी अब्दुल रशीद गाझी हा जम्मू- काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याची माहिती समोर आली आहे. जैश-ए- मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहरचा अब्दुल हा निकटवर्तीय असून अफगाणिस्तानमधील अमेरिकी सैन्याविरोधातील कारवायांसाठी मसूद अझहरने अब्दुल रशीदला अफगाणिस्तानात पाठवले होते. जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याने काल तब्बल ३५० किलो स्फोटकांनी भरलेल्या ट्रकद्वारे पुलवामा जिल्ह्यात चढवलेल्या भीषण आत्मघातकी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले आहे तर 40हून अधिक जवान जखमी झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांमध्ये जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांसाठी आलेल्या मसूद अझहरच्या पुतण्या आणि भाच्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी यमसदनी पाठवले होते. मसूदने या दोघांच्या मृत्यूनंतर जम्मू- काश्मीरमध्ये त्याचा खासमखास साथीदार अब्दुल रशीदला पाठवले. यासंदर्भातील माहिती जानेवारीमध्ये गुप्तचर यंत्रणांना देखील मिळाली होती. आयईडीद्वारे स्फोट घडविण्यात अब्दुल रशीदचा हातकंडा आहे. मसूदने अब्दुल राशीदला अफगाणिस्तानमध्ये अमेरिकी सैन्याविरोधात दहशतवादी कारवायासाठी तिथे पाठवले होते. अब्दुल हा सध्या जम्मू- काश्मीरमध्येच दडी मारुन असल्याची माहिती देखील गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे.

Leave a Comment