उदंड झाले सर्व्हे, पण अचूकतेचे काय?

evm

नेमेचि येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे निवडणुका आल्या, की मतचाचण्यांचा हंगाम येतो. साध्या भाषेत यालाच सर्व्हे किंवा सर्वेक्षण म्हणतात. प्रत्येक संस्था, वाहिनी किंवा वृत्तपत्र आपला स्वतःचा सर्व्हे घेऊन येते आणि तो खरा असल्याचे छातीठोकपणे सांगते. प्रत्यक्ष मतदान झाल्यावरही मतदानोत्तर चाचण्या (एक्झिट पोल) घेतले जातात; निवडणुकीचे निकाल जाहीर होत नाहीत तोपर्यंत त्याच्यावर हिरीरीने चर्चा केल्या जातात. निकालाच्या वावटळीत अनेकदा हे अंदाज चुकल्याचे सिद्ध झाले तरी तोच खेळ पुन्हा चालू राहतो.

सर्वेक्षण म्हटले, की आपल्याकडे निवडणुकीच्या जागांचा अंदाज किंवा एक्झिट पोल डोळ्यांसमोर येतात. मतदारांच्या वर्तनाचा व मतदानाचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने 1960 च्या दशकात दिल्लीत सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज (सीएसडीएस) ही संस्था उभारण्यात आली. निवडणुकीचेही एक शास्त्र असते आणि या शास्त्राला सेफॉलॉजी असे म्हणतात. सीएसडीएस ही संस्था याच सेफॉलॉजीचा अभ्यास करते. योगेंद्र यादव यांच्यासारखे तज्ञ याच संस्थेतून बाहेर पडले. मात्र आजकाल सेफॉलॉजी म्हणजे मतदानपूर्व आणि मतदानोत्तर सर्वेक्षण असे समीकरण रूढ झाले आहे. थोडक्यात सांगायचे तर माध्यमांचा एक खेळ म्हणून त्याकडे पाहिले जाते. त्याच्यावर विनोद केले जातात.

अगदी सुरुवातीला सर्वेक्षण केवळ इंडिया टुडे, आऊटलुक आणि फ्रंटलाईन यांसारख्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाले. हळूहळू अग्रगण्य वृत्तपत्र समूहांनीही ते प्रकाशित करणे सुरू केले. आज आपण जी सर्वेक्षणे पाहतो त्यांची सुरूवात 1980 च्या दशकात झाली. दूरदर्शन हे तेव्हा बाल्यावस्थेत होते. माध्यमातील दिग्गज प्रणय रॉय हे निवडणुकीचा आढावा घेणारा कार्यक्रम घेत असत. त्यांच्या बरोबरीने विनोद दुआ हेही असायचे. दूरदर्शनने 1996 मध्ये पहिल्यांदा अखिल भारतीय निवडणूक सर्वेक्षण केले होते. सीएसडीएसच्या कार्यकर्त्यांनी ते सर्वेक्षण केले होते आणि दूरदर्शनवर सलग पाच तास त्यावर चर्चा झाली होती.

पुढे 1990 च्या दशकात खासगी वाहिन्या आल्या आणि निवडणुक सर्वेक्षण आणि एक्झिट पोल हे त्यांच्यासाठी प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी हुकूमी साधन बनले. त्यातून लोकांच्या मनावर त्यांनी ताबा मिळविणे सुरू केले. गेल्या सुमारे दोन दशकांत तर मतदानपूर्व आणि मतदानोत्तर चाचण्या हा निवडणुकांचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र संख्या वाढली की दर्जा घसरतो म्हणतात तसे झाले. वृत्तवाहिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा वाढल्यामुळे शक्य तितक्या लवकर या चाचण्यांचे अंदाज जाहीर करण्याची प्रवृत्ती वाढली. अन् तेथेच गफलत झाली.

गेल्या काही निवडणुकांतील या सर्वेक्षणांची आणि प्रत्यक्ष निकालांची तुलना केली तर संमिश्र दृश्य दिसते. आतापर्यंत 1998 आणि 1999 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्वेक्षणांचे अंदाज बऱ्यापैकी अचूक सिद्ध झाले होते. मात्र 2004 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व एक्झिट पोल तोंडावर आपटले होते. त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) केंद्रांतील सत्ता कायम राखेल, असे सर्व माध्यमांनी म्हटले होते. मात्र प्रत्यक्षात एनडीए निवडणुकांमध्ये पराभूत झाली आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सत्तेवर आली. पुन्हा 2009 च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान वेगवेगळ्या माध्यम आणि निवडणूकतज्ञांच्या अंदाजाला सुरूंग लावत यूपीएने विजय मिळविला.

गेल्या निवडणुकीत, 2014 मध्ये, बहुतेक सर्वेक्षणांनी भाजपचा विजय होईल, असे सांगितले होते. मात्र भाजपला स्वबळावर बहुमत मिळेल हे कोणीही सांगितले नव्हते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष अभूतपूर्व असा विजय मिळवेल, हे एकाही पंडिताला सांगता आले नव्हते. त्यानंतर बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी संयुक्त जनता दल आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होईल, असे सर्व्हेंनी सांगितले होते. प्रत्यक्षात तेथे जनता दलाने एकहाती विजय मिळविला होता. तोच प्रकार उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत घडला. तेथे सर्व अंदाज धुळीस मिळवत भाजपने 300 जागा मिळविल्या. अशा घटना अधिकाधिक प्रमाणात घडत आहेत.

आता लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना असेच अनेक सर्व्हे येत आहेत. मात्र आता या सर्वेक्षणांतील गांभीर्य गेले असून तो केवळ आकड्यांचा खेळ उरला आहे. आपल्या बाजूने हवा वाहत आहे, हे दाखवण्यासाठी राजकीय पक्ष माध्यमांना हाताशी धरून हे सर्वेक्षण घडवून आणतात, असे उघडपणे बोलले जाते. त्यामुळे निवडणुकीचे विश्लेषण करणाऱ्यांची सध्या ज्योतिषांच्या खालोखाल थट्टा होत असल्यास नवल नाही.

खरे तर, आता निवडणूक सर्वेक्षणांमधील जागांचा अंदाज हा मतदारांना प्रभावित करण्यासाठी राजकीय पक्षांनी वापरलेले छुपे साधनच म्हणून पाहिला जातो. त्यांची संख्या उदंड झाली असली, तरी विश्वासार्हता आणि निःपक्षपातीपणाच्या बाबतीत त्यांची अधोगतीच होत आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचा विचारही संस्था करत असल्याचे दिसत नाही, हे अधिक शोचनीय!

Leave a Comment