स्नो स्कल्पचर स्पर्धेत अभ्युदय टीम इंडियाचा डंका

varah
जपानच्या निसर्गसुंदर नायोरा शहरात ६ ते ९ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय स्नो स्कल्पचर स्पर्धेत भारताच्या ग्रामीण भागातून आणि आर्थिक दुर्बल परिस्थितीतून आलेल्या तीन तरुणांनी १ ले बक्षीस मिळवून भारताचा झेंडा उंचावला आहे. रविप्रकाश, सुनीलकुमार कुशवाह आणि रजनीश वर्मा यांच्या अभ्युदय टीम इंडियाने कडाक्याच्या गोठविणाऱ्या थंडीत, अपुऱ्या साधनसुविधा असूनही भगवान विष्णूच्या वराह अवताराची प्रतिमा बर्फातून साकारली आणि परीक्षकांनी एकमताने ती सर्वोत्कृष्ट कलाकृती असल्याचे जाहीर केले.

या स्पर्धेत १९ वर्षानंतर प्रथमच भारतीय टीम सामील झाली होती. उणे २५ डिग्री तापमान, बर्फाचा वर्षाव आणि बोचरे वारे याची फिकीर न करता या तिघांनी ४ मीटर उंच आणि ३ मीटर रुंदीची वराह अवतारातील विष्णू मूर्ती साकारली. या स्पर्धेत ८ देशातील ११ टीम सामील झाल्या होत्या. दुसरा नंबर रशियाचा तर तिसरा नंबर थायलंडच्या टीमने मिळविला.

abyuday
रविप्रकाश, सुनील आणि रजनीश भारताच्या ग्रामीण भागातील आहेत आणि घराच्या बिकट परिस्थितीचा सामना करताना कुटुंबाची जबाबदारी पार पाडत त्यांनी मास्टर्स ऑफ फाईन आर्ट्स ही पदवी मिळविली आहे. रविप्रकाश या टीमचा प्रमुख. त्याचे वडील कुंभार होते आणि तो बिहारच्या खेड्यातून आलेला आहे. सुनील मध्यप्रदेशचा तर रजनीश उत्तरप्रदेशचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या तिघांनी जपान स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सरकारकडून मदत मिळविण्याचा खूप प्रयत्न केला कारण त्याच्याकडे विमान तिकिटासाठी पुरेसे पैसे नव्हते. मात्र सरकारी अनुदान अथवा निधी मिळू शकला नाही. तेव्हा त्यांनी या स्पर्धेची आशा सोडली होती. पण विश्व समन्वयक संघ या स्वयंसेवी संस्थेने त्यांना मदतीचा हात दिला आणि त्या मदतीचे या तिघांनी देशाला विजेतेपद मिळवून देऊन सार्थक केले.

Leave a Comment