मासिक पूजेसाठी साबरीमला मंदिर खुले; कडेकोट बंदोबस्त

sabarimala-temple
केरळमधील साबरीमला मंदिर मासिक पूजेसाठी पुन्हा उघडण्यात आले. यावेळी कडक सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ही पूजा पाच दिवस चालणार आहे.
महिलांना प्रवेश देण्यावरून साबरीमला मंदिर गेली अनेक महिने वादात सापडले आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून तीव्र निदर्शने करण्यात आली होती. त्यामुळे हे मंदिर असलेल्या टेकडीभोवती शेकडो पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला होता.
सांयकाळी 5 वाजता मंदिराची दारे उघडण्यात आली. यावेळी सुरक्षा बंदोबस्त कडक असला तरी भक्त दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले होते. खासकरून शेजारच्या राज्यांतून भक्त मोठ्या प्रमाणात आले होते, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
मुख्य पुजारी वासुदेवन नम्पूथीरी यांनी तंत्री (प्रमुख पुरोहित) कंडारू राजीवरू यांच्या उपस्थितीत मंदिराची दारे उघडली.
हे मंदिर 17 फेब्रुवारीपर्यंत उघडे राहणार आहे, असे मंदिराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दोन महिन्यांच्या वार्षिक यात्रेनंतर 20 जानेवारी रोजी ते बंद करण्यात आले होते.
मासिक पाळी येणाऱ्या वयोगटातील (10 ते 50 वर्षे) महिलांना या मंदिरात प्रवेश देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दिला होता. त्यानंतर येथे निदर्शने व आंदोलन झाली होती.

Leave a Comment