हेल्मेट तोडून पुदुच्चेरीतील आमदारांचा सक्तीला विरोध

puducherry

दुचाकी वाहनधारकांना लागू केलेल्या हेल्मेट सक्तीच्या विरोधात पुदुच्चेरीतील अण्णा द्रमुक पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी अभिनव आंदोलन केले. या आमदारांनी थेट विधानसभेच्या आवारात हेल्मेट तोडून आपला निषेध व्यक्त केला.

पुदुच्चेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी यांनी अलीकडेच ही सक्ती लागू केली आहे. बेदी यांच्या कामाची पद्धत मनमानी स्वरूपाची असल्याची टीका या आमदारांनी केली.

अण्णा द्रमुकचे विधिमंडळ पक्षनेते के. अन्बळगन आणि आमदार ए. भास्कर व वय्यापुरी मणिकंडन यांनी प्रत्येकी एक हेल्मेट आणले होते. ते त्यांनी जमिनीवर आपटून तोडले.

पुदुच्चेरी विधानसभेत अण्णा द्रमुकचे चार आमदार आहेत. पुदुच्चेरीचे पोलिस महासंचालक सुंदरी नंदा यांनी 11 फेब्रुवारीपासून हेल्मेटसक्ती लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बेदी यांनी मध्यम प्रतिनिधींना व्हाट्सअपवरून एक संदेश पाठविला होता. “रस्त्यावरच्या अपघातांची संख्या कमी करण्यासाठी कायदा पालन संस्थांनी सतत नियमांचे पालन करण्याची हीच वेळ आहे,” असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.

दरम्यान, “हेल्मेटच्या महत्त्वाबाबत एक महिन्याचे जनजागृती अभियान राबविण्यात येईल. हेल्मेटसक्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा आदर करण्यात येईल,” असे मुख्यमंत्री व्ही. नारायण स्वामी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Leave a Comment