पहिले राफेल विमान सप्टेंबरमध्ये भारतात होणार दाखल

Rafale-aircraft

राफेल लढाऊ विमानावरून एकीकडे राजकीय वादळ उठलेले असताना दुसरीकडे हे विमान प्रत्यक्षात सप्टेंबर महिन्यात भारतात दाखल होणार आहे. या विमानाची खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू असून ते वेळेवर येणार आहे असे हवाई दलाच्या सूत्रांनी मंगळवारी सांगितले.

हे विमान फ्रान्समध्ये हवाई दलाच्या ताब्यात सोपवले जाणार असून ते भारतात आणण्यात येईल असे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

हवाई दलात राफेल सामील होण्यामुळे आपल्या युद्ध क्षमतेत मोठ्या प्रमाणावर वाढ होईल, असे हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल अनिल खोसला यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष ओलांद यांच्याबरोबर केलेल्या करारानुसार 36 राफेल जेट लढाऊ विमाने भारत खरेदी करणार आहे. भारतीय वायूदलाची तातडीची गरज लक्षात घेऊन हा करार केला गेला होता.

फ्रान्सकडून भारतीय वायूदलासाठी 126 राफेल जेट लढाऊ विमाने खरेदीचा करार तीन वर्षे प्रलंबित होता.  मात्र मोदी यांनी वैयक्तिक लक्ष घालून या सौद्यात अनिल अंबानी यांना फायदा करून दिला, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. तर या व्यवहारात कुठलाही भ्रष्टाचार झाला नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment