शटडाऊन टाळण्यासाठी अमेरिकी संसद सदस्यांत सहमती, भिंतीसाठीही पैसे मिळणार

donald-trump

अमेरिकी सरकारचे कामकाज ठप्प होऊ नये, यासाठी वाटाघाटींना यश आले असून संसद सदस्यांमध्ये प्राथमिक सहमती झाली आहे. विशेष म्हणजे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आग्रह असलेल्या भिंतीच्या बांधकामासाठीही पैसे मिळणार आहेत.

ही तडजोड झाली नसती तर या आठवड्याच्या शेवटी अमेरिकी सरकारचे कामकाज ठप्प झाले असते. “अंतर्गत सुरक्षा आणि अन्य सहा विधेयकांच्या संदर्भात आमच्यामध्ये सैद्धांतिक सहमती झाली आहे,” असे यासंदर्भात चर्चा करणारे प्रमुख सिनेट सदस्य रिचर्ड शेल्बी यांनी पत्रकारांना सांगितले.

या तोडग्यानुसार, मेक्सिको सीमेवर बांधण्यात येणाऱ्या भिंतीसाठी 1.375 अब्ज डॉलर देण्यात येणार आहेत. या भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलरचा निधी द्यावा, ही  ट्रम्प यांची प्रमुख मागणी आहे.

या मंजूर करण्यात आलेल्या निधीतून सुमारे 89 किलोमीटर भिंतीचे बांधकाम होऊ शकते, असे संसद सदस्यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले. अर्थात या तोडग्याला व्हाईट हाऊसकडून मंजुरी मिळणे बाकी आहे.

या संबंधातील कायदा मंजूर करण्यासाठी अमेरिकी संसदेला शुक्रवारपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. मेक्सिकोच्या सीमेवर भिंत बांधण्यासाठी ट्रम्प यांनी निधीची मागणी केली आहे, तर डेमोक्रॅटिक पक्षाने याला विरोध केला आहे. त्यावरून 28 डिसेंबर रोजी सुरू झालेले शटडाऊन 35 दिवस चालले होते.

Leave a Comment