ईव्हीएमवर सर्व राजकीय पक्षांचा विश्वास – निवडणूक आयुक्तांचा दावा

Sunil-Arora
देशातील बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर (ईव्हीएम) विश्वास व्यक्त केला आहे, असा दावा मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी केला आहे. त्याचवेळेस काही घटक मात्र जाणूनबुजून त्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत, यावर त्यांनी खेदही व्यक्त केला आहे.
ईव्हीएममध्ये छेडछाड करणे आणि त्यात बिघाड होणे,यात फरक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचे एकही प्रकरण आतापर्यंत सिद्ध झालेले नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले.
“बहुतेक सर्व पक्षांनी विश्वास व्यक्त केला आहे. काही जणांनी आणखी व्हीव्हीपॅट पावत्यांची मोजणी करण्याची मागणी केली आहे. काही जणांना मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणखी प्रात्यक्षिके हवी आहेत जेणेकरून ईव्हीएमबाबत आणखी विश्वास निर्माण होईल,” असे तव म्हणाले.
“ईव्हीएम यंत्रांनी 2014 मध्ये एक निकाल दिला. त्यानंतर दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, त्रिपुरा आणि मिझोराममध्ये ईव्हीएमचा वापर झाला.त्या प्रत्येक वेळी वेगळा निकाल लागला. तरीही सहेतूकपणे केल्या जाणाऱ्या चिखलफेकीसाठी ईव्हीएमचा उपयोग का केला जातो,” असा प्रश्न अरोरा यांनी केला.

Leave a Comment