दक्षिण चीन सागरात अमेरिकी नौका, चीनशी संघर्ष उफाळणार

south-china-sea

दक्षिण चीन सागरात असलेल्या वादग्रस्त बेटांच्या जवळ अमेरिकेने सोमवारी दोन  युद्धनौका पाठविल्या. त्यामुळे चीन नाराज होण्याची शक्यता असून पुन्हा संघर्ष उफळण्याची शक्यता आहे.


यूएसएस स्पृआन्स आणि यूएसएस प्रेबल या दोन युद्धनौका स्प्रॅटली बेटांपासून 12 नौटिकल माईल्सवर पोचल्या. “सागरी संचार स्वातंत्र्याचा भाग” म्हणून या नौका तिथे गेल्याचे अमेरिकेच्या नौदलाने म्हटले आहे. यातील यूएसएस स्पृआन्स ही नौका नियंत्रित क्षेपणास्त्र वाहून नेणारी नौका आहे.


अतिरंजित सागरी दाव्यांना आव्हान देण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे जलमार्गांचा  वापर करण्यासाठी हे ऑपरेशन करण्यात आले, असे अमेरिकी नौदलाच्या सातव्या आरमाराचे प्रवक्ते कमांडर क्ले डॉस यांनी सीएनएन वाहिनीला सांगितले.


सोमवारची कारवाई ही अमेरिकेने यावर्षी दक्षिण चीन सागरात केलेली दुसरी कारवाई आहे.  जानेवारी महिन्यात यूएसएस मॅककॅम्पबेल ही नौका पॅरासेल बेटांपासून 12 नौटिकल माईल्सपर्यंत पोचली आहेत.


या कारवाईनंतर त्वरित चीनने आपला निषेध व्यक्त केला. हे आमच्या सागरी हद्दीतील अतिक्रमण आहे, असे सांगतानाच मध्यम व मोठ्या आकाराच्या जहाजांना लक्ष्य करण्यासाठी आम्ही क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत, असेही चीनच्या वतीने बजावण्यात आले आहे.  


“अमेरिकेच्या कृतीतून चिनी कायदे व आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन झाले आहे. चीनच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे प्रादेशिक शांतता, सुरक्षा व सुव्यवस्थेला तडा गेला आहे, असे चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

Leave a Comment