ट्विटरच्या सीईओला 25 फेब्रुवारीला हजर होण्याचे संसदीय समितीचे आदेश

Jack-Dorsie
भारतीय संसदे समक्ष हजर होण्यास टाळाटाळ करणाऱ्या ट्विटरचा मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी याला संसदेने हिसका दाखवला आहे. डोर्सी याला येत्या 25 फेब्रुवारी रोजी हजर होण्याचा आदेश या समितीने पाठवले आहे.

संसदेच्या माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित समितीने मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरच्या सीईओला समन्स पाठविले आहे, असे या समितीचे अध्यक्ष खासदार अनुराग ठाकूर यांनी सांगितले.

समितीने डोर्सी याला सोमवारी सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र या सुनावणीसाठी कमी वेळ दिल्याचे कारण देऊन डोर्सी आणि ट्विटर इंडियाच्या अन्य अधिकाऱ्यांनी या सुनावणीला यायचे टाळले होते. ट्विटर इंडियाचे काही प्रतिनिधी बैठकीसाठी आले होते मात्र समितीने त्यांना चर्चेसाठी बोलावले नाही, असे सूत्रांनी सांगितल्याचे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

नागरिकांच्या खासगीपणाचे संरक्षण आणि निवडणुकांमध्ये सोशल मीडियाच्या गैरवापराची शक्यता, या दोन मुद्द्यांवर कंपनीचे मत जाणून घेण्यासाठी समितीने ट्विटरच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते. आधी ही बैठक 7 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली होती, परंतु ट्विटरच्या अधिकाऱ्यांना अधिक वेळ देण्यासाठी ती 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

सोमवारी झालेल्या बैठकीत माहिती तंत्रज्ञान खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Comment