…तर देश पुन्हा परक्यांचा गुलाम होऊ शकतो – सुब्रमण्यम स्वामी

subramaniam-swami
मुंबई – मुंबईतील चेंबूर येथे भारत विकास परिषद आयोजित “आधुनिक भारताची परिकल्पना : भविष्यातील मार्ग” या विषयावर व्याख्यानात बोलताना भाजप खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी आधुनिक भारतासाठी प्राचीन संस्कृतीचा सन्मान करणे आवश्यक आहे. अन्यथा कितीही विकास केला तरी देश पुन्हा परक्यांचा गुलाम होऊ शकतो असे स्पष्ट प्रतिपादन केले आहे.

यावेळी पुढे डॉ. स्वामी म्हणाले की, संस्कृत आणि देवनागरी लिपी या देशात अनिवार्य केली पाहिजे. प्रत्येक भाषेत संस्कृत शब्दच अधिक आहेत. देशाचा अभिमानास्पद इतिहास व संस्कृतीच्या ऐवजी देशातील पाठ्यपुस्तकात मुघल आणि इंग्रजांचे उदात्तीकरण शिकवले जाते. त्यामुळे ही पुस्तकेही लवकरात लवकर बदलली पाहिजेत असेही ते म्हणाले.

भारतीय संस्कृती आज जग स्वीकारत आहे, पण योगाला ख्रिश्चन योगा म्हटले जाते, हे मात्र थांबले पाहिजे. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संस्कृत सर्वाधिक उपयुक्त भाषा आहे असे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर्नल या नासाच्या जर्नलमध्ये म्हटले असल्यामुळे देशात संस्कृत सर्वांना शिकवले पाहिजे, असे ते म्हणाले. श्रीराम जन्मभूमीवर मंदिराचे काम सुरू करण्यासाठी कोर्टाच्या परवानगीची गरज नाही, असे ते म्हणाले. या जागी पूर्वी मंदिरच होते हे सर्वांनी मान्य केलेलेच आहे, असे सांगून स्वामी पुढे म्हणाले की या जागेचे नरसिंह राव यांनीच राष्ट्रीयीकरण केलेले आहे. आता या जागेवर न्यायालयाचा काहीही अधिकार चालत नाही. केवळ मूळ जमीन मालकाला किती भरपाई द्यायची हाच निर्णय कोर्ट देऊ शकते असेही ते म्हणाले. राम मंदिरासाठी पुन्हा भाजपाला निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले. या देशातील सर्वांचा डीएनए एकाच आहे, त्यामुळे सर्वांनी सर्व भेद विसरून एकत्र राहिले पाहिजे असे आवाहन स्वामी यांनी यावेळी केले. ते म्हणाले की प्राचीन काळात कधीही भेदाभेद असलेला आल्या संस्कृतीत व इतिहासात दिसत नाही.

Leave a Comment