राजकुमारीच्या पंतप्रधानपदाला राजाचा खोडा – थायलंडमध्ये नवा पेच

thailand
थायलंडच्या राजकुमारीला पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्याचा प्रयत्न एका दिवसाच्या आत अयशस्वी ठरला आहे. ही उमेदवारी देण्याचा प्रस्ताव संबंधित राजकीय पक्षाने परत घेतला आहे. राजकुमारीच्या उमेदवारीला राजाने विरोध केल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

थायलंडमध्ये येत्या मार्च महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यासाठी थाई रक्षा चार्ट पार्टी या पक्षाने राजा वजिरलोंगकोर्न यांची 67 वर्षीय बहीण राजकुमारी उबोलरत्ना राजकन्या यांना उमेदवारी दिली होती.

मात्र यावर राजा वजिरलोंगकोर्न यांनी सडकून टीका केली होती. शाही घराण्यातील कोणालाही राजकीय उमेदवारी देणे हे परंपरा, राष्ट्रीय संस्कृतीच्या विरोधात आणि अनुचित असल्याचे राजाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले होते.

त्यामुळे राजाच्या इच्छेचा मान राखत राजकुमारी उबोलरत्ना यांची उमेदवारी परत घेत असल्याचे पक्षाच्या वतीने शनिवारी स्पष्ट करण्यात आले. माजी पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांच्याशी हा पक्ष संबंधित असून शिनावात्रा यांना सैन्याने 2005मध्ये बंडखोरी करून सत्तेतून बेदखल केले होते.

थायलंडमध्ये घटनात्मक राजेशाही असून त्या अंतर्गत आपण परंपरा व प्रथांचा सन्मान करू, असेही पक्षाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान, राजकुमारी उबोलरत्ना यांनी इन्स्टाग्रामवरून समर्थकांचे आभार मानले आहेत. थायलंडने आता पुढे जायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी राजाच्या टीकेवर काहीही टिप्पणी केली नाही.

थायलंडमधील निरंकुश राजेशाही 86 वर्षापूर्वी पूर्ण संपुष्टात आली होती. त्यानंतर शाही कुटुंबातील कोणा व्यक्तीने राजकारणात उमेदवारी करण्याची घटना घडलेली नाही.

Leave a Comment