उदयनराजेंविरोधात नव्हे तर राष्ट्रवादीच्याविरोधात उमेदवार देणार शिवसेना – दिवाकर रावते

diwajar-raote
सातारा – लोकसभा निवडणुकीची घटिका जसजशी जवळ येत आहे तसतसे राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. त्यातच साता-यातील लोकसभेच्या जागेवरुन सुरु असलेला संभ्रम अद्याप कायम असतानाच शिवेसेना नेते दिवाकर रावते यांनी एक वक्तव्य केले आहे. त्यांनी शिवसेनेकडेच सातारा लोकसभेची जागा असल्यामुळे आम्ही तेथे उदयनराजेंच्या विरोधात नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरोधात उमेदवार देणार आहोत. कोणालाही आम्ही ऑफर देत नाही. जे शिवसेनेच्या ध्येय-धोरणात बसते, आम्ही त्याचाच सन्मान करतो. वाल्याचा वाल्मीकी करण्याचे आमचे धोरण नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

त्यांच्याशी येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांनी संवाद साधला. सातारा लोकसभेच्या जागेविषयी काय सांगाल, असे त्यावेळी विचारले असता मंत्री रावते म्हणाले, शिवसेनेकडेच साताऱ्याची जागा राहणार असून आम्ही ती पूर्ण ताकदीने लढणार आहोत. लोकसभेत उमेदवार महत्त्वाचा नसतो. पक्ष लढतो आणि तोच महत्त्वाचा आहे.

मी छत्रपतींना साताऱ्याबाबत सह्याद्रीवर भेटलो होतो. भाजपचे चार मंत्री त्यावेळी त्यांना गराडा घालून उभे होते. छत्रपतींच्या विरोधात कोणीही उभे राहू नये. छत्रपतींचा घराण्याचा मान म्हणून साताऱ्याची ही एकमेव जागा असली पाहिजे. पण, पक्ष म्हणून उदयनराजे लढले तर त्या पक्षाच्या विरोधात आम्ही लढणार आहोत. राष्ट्रवादीला त्यांची ही जागा पक्की असल्याचे वाटत असल्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही लढणार आहोत. उदयनराजेंना तुम्ही ऑफर दिली होती का, यावर मंत्री रावते म्हणाले, कोणालाही आम्ही ऑफर देत नाही. जे शिवसेनेच्या ध्येय-धोरणात बसते, त्यांच्याशी आमचे जमते. गेल्यावेळी युतीमध्ये निर्णय झाल्यामुळे साताऱ्याची जागा रिपब्लिकन पक्षाला दिली होती. आम्ही यावेळेस साताऱ्यातून लढणार आहोत. हा मतदारसंघ रिपब्लिकन पक्षाकडे नाही. शिवसेना या वेळेस छत्रपतींच्या वंशजांविरोधात उमेदवार देणार असल्याच्या प्रश्‍नावर रावते म्हणाले, आम्ही छत्रपतींच्या विरोधात नव्हे तर पक्षाच्या विरोधात उमेदवार देत आहोत.

Leave a Comment