शेन वॉर्न राजस्थान रॉयल्सचा ब्रँड अॅम्बेसेडर

shane-warne
मुंबई – आयपीएलच्या आगामी हंगामासाठी राजस्थान रॉयल्सने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्नला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. २००८ साली झालेल्या आयपीएल पहिल्या सत्रात राजस्थान रॉयल्सने शेन वॉर्नच्या नेतृत्वात विजेतेपद पटकावले होते.


वॉर्न राजस्थानच्या संघासोबत काम करण्याबाबत म्हणाला, की मी खूप आनंदी आहे. संघ आणि चाहत्यांचा मला समर्थन दिल्याबद्दल आभारी आहे. संधीचा फायदा घेत संघाकडून चांगली कामगिरी करून घेण्याचा प्रयत्न करेल. आम्ही संघाची नवी ओळख बनवण्याचा प्रयत्न करू. आशा करतो, की संघाची नवी जर्सी संघाला आणि चाहत्यांना आवडली असेल.

याआधी शेन वॉर्नने राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपदासोबत मेंटॉरची भूमिकादेखील निभावली आहे. आयपीएलच्या ४ सत्रात वॉर्नने राजस्थानचे नेतृत्व केले होते. त्यानंतर, त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतली. आता १२ व्या सत्रासाठी त्याची राजस्थानच्या संघात वॉर्नचे पुनरागमन झाले आहे.

त्याचबरोबर आयपीएलच्या आगामी सत्रात राजस्थान रॉयल्स गुलाबी रंगाची जर्सी परिधान करणार आहे. गुलाबी रंगाच्या जर्सीचे राजस्थान रॉयल्सने अधिकृतरित्या अनावरण केले. ‘राजस्थान रॉयल्स’ जयपूर स्थित फ्रँचायझी आहे. गुलाबी शहर नावाने जयपूर हे ओळखले जाते. राजस्थानमधील जयपूर आणि उदयपूर ही २ शहरे गुलाबी दगडांच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे, गुलाबी रंग हा राजस्थान संघाच्या जर्सीसाठी योग्य आहे. गुलाबी रंगामुळे विशिष्ट ओळखीबरोबर चाहत्यांना उत्साह वाढवण्यास देखील मदत होणार आहे, असे राजस्थान रॉयल्सच्यावतीने सांगण्यात आले.


राजस्थानने काही सामन्यांसाठी गेल्यावर्षी गुलाबी रंगाची जर्सी परिधान केली होती. या जर्सीला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. याआधी झालेल्या आयपीएलच्या 11 व्या सत्रात राजस्थान रॉयल्सने निळ्या रंगाची जर्सी परिधान केली होती. आता १२ व्या हंगामापासून संघ गुलाबी रंगाची जर्सी परिधान करणार आहे.