ट्विटरच्या सीईओ आणि अधिकार्‍यांचा संसदीय समितीसमोर हजर होण्यास नकार

jack-dorsey
ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) तसेच अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित संसदीय समितीसमोर हजर होण्यास नकार दिला आहे. समितीच्या सूत्रांनी पीटीआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली

या संसदीय समितीने सोशल मीडियावर नागरिकांच्या  अधिकारांच्या संरक्षणासाठी चौकशीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले होते. भारतीय जनता पक्षाचे खासदार अनुराग ठाकूर हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीने 1 फेब्रुवारी रोजी पत्र पाठवून कंपनीच्या अधिकाऱ्यांना बोलावले होते.

समितीची ही बैठक सात फेब्रुवारी रोजी होणार होती मात्र ट्विटरच्या सीईओ आणि अन्य अधिकाऱ्यांना अधिक वेळ देण्यासाठी ती 11 फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली.

मात्र सुनावणीसाठी कमी वेळ देण्यात आल्याचे कारण पुढे करून ट्विटरने या समितीसमोर हजर होण्यास नकार दिला असे सूत्रांनी सांगितले. ट्विटरच्या कायदा, धोरण, विश्वास आणि सुरक्षा विभागाच्या जागतिक प्रमुख विजया गड्डे यांच्याकडून समितीला 7  फेब्रुवारी रोजी एक पत्र मिळाले. त्यात म्हटले होते, की “ट्विटर इंडियासाठी काम करणारीी कोणतीही व्यक्ती आशय आणि खात्याशी संबंधित आमच्या नियमांच्या संबंधात प्रभावी निर्णय घेत नाही. या परिस्थितीत संसदीय समिती समोर एखाद्या कनिष्ठ कर्मचाऱ्याला योग्य दिसणार नाही.”

Leave a Comment