प्रिन्स फिलीप यांनी केला ड्रायव्हिंग लायसन्सचा त्याग

prince-philip
कारचा अपघात करून एका महिलेच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरलेले इंग्लंडचे राजे प्रिन्स फिलीप यांनी आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सचा त्याग करण्याचे ठरविले आहे. प्रिन्स फिलीप हे 97 वर्षांचे असून बकिंघम पॅलेसने एका निवेदनातून त्यांचा हा निर्णय जाहीर केला आहे

“संपूर्ण विचारांती ड्यूक ऑफ एडिनबर्ग यांनी आपले ड्रायव्हिंग लायसन्स अधिकाऱ्यांकडे सोपविण्याचा निर्णय घेतला आहे,” असे राजघराण्याच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

प्रिन्स फिलीप यांनी गेल्या महिन्यात हा अपघात केला होता त्यात लँडरोव्हर चालविणारे प्रिन्स फिलीप यांनी एका कारला धडक दिली होती. नॉरफॉल्क येथे हा अपघात घडला होता. त्यात एम्मा फेअरवेदर या महिलेचा एक हात मोडला होता. या घटनेमुळे आपल्याला धक्का बसला असल्याचे फिलीप यांनी नंतर म्हटले होते. तसेच त्यांनी संबंधित महिलेची माफीही मागितली होती.

इंग्लंड पोलिसांनी या घटनेचा तपास क्राऊन प्रोसेक्युशन सर्विस (सीपीएस) या खात्याकडे सोपविला आहे.  प्रिन्स फिलीप त्यांच्यावर यासंदर्भात खटला दाखल करावा की नाही याबाबत सीपीएसने अद्याप निर्णय घेतलेला नाही. प्रिन्स फिलीप हे राणी एलिझाबेथ यांचे पती आहेत.

Leave a Comment