लोकसभेला प्रकाश आंबेडकर शरद पवारांविरोधात देणार उमेदवार

prakash-ambedkar
मुंबई- भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली नाही तर लोकसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांविरोधात उमेदवार देऊ, असा इशारा दिला आहे. त्यांनी पवार यांच्या माढ्यातून पुन्हा लोकसभा लढवण्याच्या निर्णयाचेही स्वागत केले. तर, राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा जिंकण्याचे वक्तव्य भाजपध्यक्ष अमित शहा यांनी केले. मात्र, त्यांनी किमान ४० जागांची मतमोजणी व्हीव्हीपॅटने करावी, असे आव्हानही आंबेडकर यांनी दिले आहे.

मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, २३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर ओबीसी परिषद आयोजित केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार त्यापूर्वी निश्चित होतील. काँग्रेसला संघाशी लढायचे नसल्यास आम्ही आमच्या स्वतंत्र वाटेने जायला मोकळे आहोत. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे काँग्रेसने लवकरात लवकर संघाविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेसबरोबर निवडणूकपूर्व आघाडी झाली नाही तरी निवडणुकीनंतर आघाडी होऊ शकते, असेही आंबेडकरांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीसंदर्भातली वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसची चर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यावर अडली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास संघाला घटनात्मक चौकटीत आणण्यासाठी काय उपाययोजना करणार, ते काँग्रेसने स्पष्ट केले पाहिजे. त्याशिवाय काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, याचा पुनरुच्चारही आंबेडकर यांनी केला.

Leave a Comment