लष्करे तैयबात सामील होण्यासाठी जाणाऱ्या अमेरिकी व्यक्तीला विमानतळावर अटक

america
लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी जाणाऱ्या अमेरिकी व्यक्तीला ऐन विमानतळावर अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील या संघटनेचे जाळे अमेरिकेत पसरले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

जीझस विलफ्रेडो एनकार्नासियोन असे या व्यक्तीचे नाव असून तो 29 वर्षांचा आहे. न्यूयॉर्कमधील मॅनहटन भागातील तो रहिवासी आहे. त्याला अटक केल्याची माहिती अमेरिकी अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली.

गुरुवारी जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्याला पकडण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

या संघटनेत सामील होण्यासाठी एनकार्नासियोन याने ऑनलाईन माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. तसेच गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याने आपल्या एका साथीदाराजवळ तैयबात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. आपल्याला लोकांना गोळ्या घालायच्या असून त्यांचा शिरच्छेद करायचा आहे, असे त्याने एका गुप्तचर अधिकाऱ्याला सांगितले होते, असे असिस्टंट अॅटॉर्नी जनरल जॉन डेमर्स यांनी पत्रकारांना सांगितले.

यापूर्वी फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने टेक्सासमधील एका किशोरवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. सोशल मीडियावरून या दहशतवादी संघटनेसाठी लोकांची भरती करण्याचा त्याच्यावर आरोप होता.

लष्करे तैयबा ही दहशतवादी संघटना मुंबईतील 226 नोव्हेंबर 2008 रोजीच्या हल्ल्यासाठी जबाबदार असून अमेरिका व संयुक्त राष्ट्रसंघाने तिला दहशतवादी संघटना म्हणून जाहीर केले आहे.

Leave a Comment