मेहबूबा मुफ्तींकडून इम्रान खान यांची स्तुती; केंद्रावर आगपाखड

mehbooba-mufti
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती सईद यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची स्तुती केली आहे त्याच वेळेस त्यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.

एका वनक्षेत्राला गुरूनानक देव जी यांचे नाव दिल्याबद्दल मेहबूबा यांनी इमरान खान यांचे कौतुक केले आहे. तर दुसरीकडे भारतातील केंद्र सरकार फक्त शहरांचे नाव बदलणे आणि अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम करणे यालाच प्राधान्य देताना दिसते, असे त्या म्हणाल्या.

“ काळ किती बदलतो. केंद्राचे प्रमुख प्राधान्य ऐतिहासिक शहरांचे नाव बदलणे आणि राम मंदिराचे बांधकाम एवढेच दिसून येते. दुसरीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान बालोकी वन क्षेत्राला गुरूनानक जी यांचे नाव देणे तसेच त्यांच्या नावाने एक विद्यापीठ उभारणे यासाठी पावले उचलताना पाहणे मनाला सुखावून जाते,” असे ट्विट त्यांनी रविवारी केले.

बालोकी वनक्षेत्राला बाबा गुरू नानक यांचे नाव देण्यात येईल. तसेच ननकाना साहिब येथे त्यांच्या नावाने एक विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशी घोषणा इमरान खान यांनी एका समारंभात केली होती. पाकिस्तान सर्व नागरिकांचा आहे आणि गुरू नानक जी यांच्या 550 व्या जयंतीनिमित्त शीख भाविकांची यात्रा सुखरूप होईल हे आम्ही सुनिश्चित करू असे ते म्हणाले होते.

Leave a Comment