राहुल गांधींमुळे सोडले पक्ष आणि मंत्रिपद – एस. एम. कृष्णा

sm-krishna
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सतत होणाऱ्या हस्तक्षेपामुळे मंत्रीपद तसेच काँग्रेस पक्ष सोडावा लागला असा गौप्यस्फोट माजी केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांनी केला आहे.

शनिवारी कर्नाटकातील मुद्दूर येथे एका सभेत बोलताना कृष्णा यांनी हा दावा केला. संसदेत किंवा सरकारमध्ये कुठलेही पद नसताना राहुल गांधी सतत फर्मान काढायचे असा आरोप कृष्णा यांनी केला. कृष्णा यांनी गेल्यावर्षी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.

“मी साडेतीन वर्षे परराष्ट्रमंत्री होतो आणि त्यावेळी मनमोहन सिंग यांना काहीही अधिकार नव्हता. त्यावेळी राहुल गांधी हे कोणीही नव्हते. अगदी पक्षाचे सरचिटणीसही नव्हते. तरीही त्यांनी असे फर्मान काढले, की ऐंशी वर्षाच्या व्यक्तीला मंत्रिपद धारण करता येणार नाही. हे ऐकताच मी माझा राजीनामा दिला आणि बंगलोरला आलो,” असे ते म्हणाले.

राहुल गांधी हे त्यावेळी संसद किंवा सरकार कुणालाही उत्तरदायी नव्हते. यूपीएच्या काळात सरकार चालविण्यासाठी योग्य वातावरण नव्हते. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारात विविध पक्षांच्या आघाडीमुळे भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे घडली, असेही ते म्हणाले.

Leave a Comment