हृतिकचा ‘सुपर ३०’ होणार ‘या’ दिवशी रिलीज

super-30
हुशार असलेल्या परंतु गरिबीमुळे मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत गणित शिकवण्याचा उपक्रम बिहारमध्ये राबविणा-या भारतीय गणितज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चरित्रपट तयार झाला असून आनंद कुमार हे बिहारमध्ये ‘सुपर-३०’ या नावाने आपली संस्था चालवतात. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला यावरच आधारित ‘सुपर-३०’ चित्रपट येणार आहे. पण या चित्रपटाची रिलीज डेट चित्रीकरण पूर्ण होऊनही गेल्या अनेक दिवसांपासून निश्चित झाली नव्हती.

चित्रपटाला आता अखेर रिलीज डेट मिळाली असून हा चित्रपट आता २६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट यापूर्वी कंगना राणावतच्या मणिकर्णिका आणि नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ठाकरे सोबत २५ जानेवारीला प्रदर्शित होणार होता. याबद्दल अधिकृत घोषणाही झाली होती. पण काही कारणांमुळे अचानक ही तारीख पुढे ढकलण्यात आली.

अद्यापही चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचे नेमके कारण अस्पष्ट आहे. पण ‘ठाकरे’ आणि ‘मणिकर्णिका’देखील याच दिवशी प्रदर्शित होणार असल्याने प्रदर्शनाची तारीख बदलली असल्याचे म्हटले जात आहे. चित्रपटात हृतिक रोशनशिवाय मृणाल ठाकूर आणि पंकज त्रिपाठी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.