मायानगरी मुंबईतील हिंदीचा वाढत आहे टक्का

languages
मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मायानगरी मुंबईत अनेक भाषा आणि प्रातांचे लोक राहायला आहेत. पण असे असले तरी मुंबईची बोलीभाषा मराठी असल्याचे आजवर आपण मानत होतो. पण मुंबईच्या लोकसंख्येत परप्रांतियांच्या येणा-या लोंढ्यांमुळे वाढ होत आहे. त्यामुळेच मुंबईची हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. प्रत्येक मुंबईकर मूळचा कुठचा आहे त्यासंदर्भात संख्यात्मक विश्लेषण करणारी अलीकडची कुठलीही माहिती उपलब्ध नाही.

२०११ सालचा मातृभाषे संदर्भातला जनगणनेचा जो अहवाल आहे त्यानुसार हिंदी मातृभाषिकांची मुंबईतील संख्या ४० टक्क्यांनी वाढली असून मुंबईत २००१ साली हिंदी मातृभाषिकांची संख्या २५.८८ लाख होती. हेच प्रमाण २०११ मध्ये ३५.९८ लाख झाले. मराठी मातृभाषिकांच्या संख्येत त्याचवेळी २.६४ टक्के घट झाली. २००१ साली ४५.२३ लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले होते. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले.

हे बदल मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि रायगडमध्येही लोकसंख्येतील दिसून येतात. ठाणे, रायगडमधील हिंदी भाषिकांच्या संख्येत तब्बल ८० टक्के वाढ झाली आहे. बदलत्या लोकसंख्येमुळे सरकारच्या फक्त नियोजन आणि धोरणांमध्येच बदल होत नाही तर या भागात नवीन राजकारणही आकाराला येत आहे. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा संघर्ष मुंबईने अनेकदा अनुभवला आहे. राज ठाकरेंच्या मनसेला २००९ विधानसभा निवडणुकीत याच मुद्दाचा फायदा झाला होता. त्यावेळी एकाच फटक्यात मनसेचे १३ आमदार निवडून आले होते.

मुंबईतील मराठी मातृभाषिकांची संख्या कमी झाली असली तरी मुंबईत आजही अन्य भाषिकांच्या तुलनेत मराठी मातृभाषिकांची संख्या जास्त आहे. २००१ साली मराठी मातृभाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ४५.२४ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले. त्याच दशकभरात गुजराती भाषिकांची संख्या किंचित कमी झाली. २००१ साली १४.३४ लाख लोकांनी गुजराती मातृभाषा असल्याचे सांगितले होते. २०११ मध्ये हीच संख्या १४.२८ लाख होती.

२००१ साली ऊर्दू भाषिक १६.८७ लाख होते. २०११ मध्ये हे प्रमाण १४.५९ लाख झाले. फक्त हिंदी भाषिकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. २५.८२ लाखावरुन हिंदी मातृ भाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ३५.९८ लाख झाली. ३९.३५ टक्के ही वाढ आहे. कुटुंब विस्तार आणि मुंबईत वाढलेल्या जागांच्या किंमतीमुळे मूळ मराठी भाषिक मुंबईकर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वास्तव्याला गेला. पण तिथेही हिंदी भाषिकांची संख्या झपाटयाने वाढली. ठाणे जिल्ह्यात हिंदी भाषिकांची संख्या ८०.४५ टक्के तर रायगड जिल्ह्यात ८७ टक्के आहे.

Leave a Comment