मोदी भक्त सरकारी अधिकाऱ्यांना काँग्रेसचा धमकीवजा इशारा?

kapil-sibal
नवी दिल्ली – भारताचे महालेखापाल राजीव मेहरिषी यांच्यावर राफेल करारावरून काँग्रेसने रविवारी ताशेरे ओढले. त्याचबरोबर काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी आज पंतप्रधान मोदींशी निष्ठा दाखवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना एक प्रकारे धमकीच दिली. काँग्रेसची या अधिकाऱ्यांवर विशेष नजर असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मोदींशी जवळीक दाखवणाऱ्या अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की निवडणुका येतात आणि जातात. आम्ही कधी विरोधी पक्षात असतो तर कधी सत्ताधारी पक्षात पण पंतप्रधान मोदींशी निष्ठा दाखवणाऱ्या काही अतिउत्साही अधिकाऱ्यांवर काँग्रेसची नजर आहे. त्यांनी संविधानापेक्षा कोणतीच गोष्ट मोठी नाही हे लक्षात ठेवावे, असा धमकीवजा इशाराच यावेळी कपिल सिब्बल यांनी दिला.

राफेल करार झाला तेव्हा महालेखापाल राजीव मेहरिषी हे भारताचे वित्त सचिव होते. ते स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्नात भाजप सरकारचा बचाव करत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. सुरवातीला राफेलचा सौदा करणाऱ्या टीममध्ये अर्थमंत्रालयाचाही सहभाग होता. राजीव मेहरिषी यांच्या देखरेखीखालीच कराराची बोलणी झाली होती. आता कॅग आपल्या अहवालातून भाजपला वाचवत असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे.