लवकरच भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल होणार अमेरिकेचे ‘चिनुक’

chikoon
नवी दिल्ली – लवकरच भारतीय हवाई दलामध्ये अमेरिकेचे अवजड मालवाहू हेलिकॉप्टर ‘चिनुक’ दाखल होणार आहे. गुजरातच्या मुंद्रा विमानतळावर या हेलिकॉप्टर्सची पहिली खेप आली आहे. भारत सरकारने हे विमान २०१५ मध्ये अमेरिकेकडून खरेदी केले होते. भारतीय हवाई दलाच्या ताकदीत या हेलिकॉप्टरमुळे वाढ होणार आहे.

२०१५ मध्ये भारतीय संरक्षण मंत्रालयाने २२ अपाचे आणि १५ चिनुक हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार अमेरिकेशी केला होता. या वर्षी मार्चमध्ये हे हेलिकॉप्टर भारतीय वायुसेनेत दाखल होणार होते. या हेलिकॉप्टरची पहिली बॅच भारतात दाखल झाल्यामुळे आता लवकरच लष्कराच्या ताफ्यामध्ये ते सामिल होतील.

बोईंग सीएच-४७ म्हणूनही ‘चिनुक’ हेलिकॉप्टर याला ओळखले जाते. या हेलिकॉप्टरचा उपयोग अमेरिकी सैन्यातील अवजड माल वाहून नेण्यासाठी केला जात होता. या हेलिकॉप्टरला पुढे आणि मागे मोठे पंखे आहे. या पंख्यांमुळे प्रतिकुल हवामानातही या हेलिकॉप्टरचा वापर करता येतो.

हेलिकॉप्टरला मागे एक आणि साईडच्या दोन्ही बाजूंना दोन मोठे दरवाजे असल्यामुळे त्यात अवजड लष्करी वाहनेही वाहून नेता येतात. त्याच्या तळाला तोफा, चिलखती वाहने, जीप इत्यादी वाहून नेता येते. तर ताशी २६९ किमी वेगाने १२०० किलोमीटरचे अंतर सहज कापण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये आहे. अमेरिकेसह ऑस्ट्रेलिया, इजिप्त, ग्रीस, इटली, जपान, स्पेन, अर्जेंटीना या देशांकडेही चिनुक हेलिकॉप्टर्स आहेत.