१३ फेब्रुवारीला दिल्लीत केजरीवाल, ममतांसह नायडूंची संयुक्त रॅली

combo
नवी दिल्ली – १३ फेब्रुवारीला राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी आणि एन. चंद्राबाबू नायडू रॅली आयोजित करणार आहेत. ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ असे नाव दिल्ली, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी एकत्र येऊन रॅलीला देण्यात आले आहे. रॅलीत भाजपविरोधी पक्षांतील काही इतर नेतेही सहभागी होणार असल्याचे आम आदमी पक्षातर्फे सांगण्यात आले.

सध्या भारतात राजकीय दृष्टीने निर्णायक स्थिती आहे. संविधान आणि लोकशाही संपवण्याचा घाट मोदी-शहा जोडगोळीने घातला आहे. देशातील हजारो स्वातंत्र्य सैनिकांनी संविधान आणि लोकशाहीसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. आज प्रत्येक देशप्रेमी भारतीयाचे ते वाचवण्यासाठी उभे राहणे हे कर्तव्य आहे. केजरीवाल, ममता, नायडू यासाठी एकत्र आले असल्याचे आप नेते गोपाळ राय यांनी म्हटले आहे.

तीनही राज्यांचे मुख्यमंत्री १३ फेब्रुवारीला ‘हुकूमशाही हटवा, लोकशाही वाचवा’ रॅलीला संबोधित करणार आहेत. भाजपव्यतिरिक्त इतर पक्षांची सरकारे असलेल्या राज्यांना नरेंद्र मोदी व अमित शहा भेटी देत आहेत. तसेच तेथील जनतेला भाजपकडे आकृष्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. इतर भाजप नेतेही तेच करत आहेत. यामुळे देशाच्या संघराज्याच्या संरचनेचा उपहास केला जात आहे. मोदी सरकारने केंद्रीय संस्थांचा धूर्तपणे गैरवापर करून राजकीय विरोधकांची गळचेपी केली आहे. नियम आणि कायद्यांचा अनादर करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारने पार केल्या आहेत,’ असे राय यांनी म्हटले आहे.