लोकसभा निवडणूक लढविणार नाही – सेहवागचा निर्वाळा

virendra-sehwag
आगामी लोकसभा निवडणूक आपण लढविणार नसल्याचे माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने स्पष्ट केले आहे. यामुळे सेहवागच्या राजकारण प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

येत्या लोकसभा निवडणुकीत सेहवाग भाजपच्या तिकिटावर रोहतक येथून निवडणूक लढविण्याची चर्चा होती. गेल्या काही दिवसांत अनेक माध्यमांच्या बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला होता. रोहतक येथून तीन वेळा खासदार असलेल्या दीपेन्द्र सिंग हुड्डा यांच्या विरोधात भाजपने या माजी भारतीय सलामीवीराला मैदानात उतरविण्याचे ठरविले आहे, असे माध्यमांनी म्हटले होते. मात्र, भाजपचे प्रदेश अध्यक्ष सुभाष बारला यांनी या बातम्यांचे खंडन केले होते.

शुक्रवारी ट्विटरवरून सेहवागने यावर आपली भूमिका मांडली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही अशा अफवा पसरविण्यात आल्या होत्या, याकडे सेहवागने लक्ष वेधले. आपण निवडणूक लढविण्यास उत्सुक नाहीत, असे त्याने स्पष्ट केले.

“काही गोष्टी कधीही बदलत नाहीत, उदा. ही अफवा. हीच 2014 मध्ये होती आणि 2019 मध्ये या अफवेत काहीही सुधारणा झाली नाही. तेव्हाही रस नव्हता, आताही स्वारस्य नाही. बात खतम,” असे ट्विट सेहवागने केले.

Leave a Comment