त्या पोलिस अधिकाऱ्यांना ममता देणार बंगालचा सर्वोच्च सन्मान!

mamta-banerjee
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या धरणे आंदोलनात भाग घेणाऱ्या ज्येष्ठ पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध एकीकडे केंद्र सरकार दंडात्मक कारवाई करण्याची तयारी करत आहे. दुसरीकडे केंद्राने ही कारवाई केली, तर या अधिकाऱ्यांना बंगालचा सर्वोच्च राज्य पुरस्कार देण्यात येईल, असे बॅनर्जी यांनी जाहीर केली आहे.

केंद्राने आपले पदक परत घेतले तर मी या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना राज्याचा सर्वोच्च सन्मान ‘बंगबिभूषण’ देईन, असे बॅनर्जी यांनी शुक्रवारी सांगितले.

शारदा चिट फंड घोटाळ्याच्या संबंधात कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करण्याचा निर्णय केंद्रीय अन्वेषण खात्याने (सीबीआय) घेतला होता. त्या विरोधात बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन केले होते. त्या धरणे आंदोलनात त्यांच्या सोबत सहभागी झालेल्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारला गुरुवारी दिले होते. या पोलिसांचे सेवा पदक परत घेण्याचेही केंद्राने ठरविले होते.

पश्चिम बंगालचे पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र, अतिरिक्त पोलीस महासंचालक विनीत कुमार गोयल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) अनुज शर्मा, पोलीस आयुक्त ज्ञानवंत सिंग आणि अतिरिक्त पोलिस आयुक्त (कोलकाता) सुप्रिम दरकार या अधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. हे अधिकारी 4 फेब्रुवारी रोजी बॅनर्जी यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी साध्या कपड्यात उपस्थित होते.

“जर केंद्राने त्यांची पदके परत घेतली तर मी या पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘बंगबिभूषण’ प्रदान करेन. त्यांनी मला पत्र पाठविले, तर मीही कठोर शब्दांतील पत्र पाठवेन,” असे त्या म्हणाल्या.

Leave a Comment