बिहारी नसते तर महाराष्ट्रातील कारखाने केव्हाच बंद झाले असते – सुशीलकुमार मोदी

sushil-kumar-modi
नागपूर : भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीकरिता जाहीरनामा बनवण्यासाठी ‘आपल्या मनाची बात’ ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेची माहिती देण्यासाठी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार मोदी नागपुर दौ-यावर असून त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात बिहारी युवक काम करीत असून येथील उद्योग, कारखाने ते नसते तर केव्हाच बंद झाले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले. बिहारमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आल्या आणि त्याचवेळी चंद्रावर उद्योग सुरू झाले तर बिहारमधील युवक तिथेही रोजगारासाठी जातील, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात रोजगारासाठी आलेल्यांच्या विरोधात मनसे आणि शिवसेनेने आंदोलन केले. मोदी त्याचा संदर्भ देत म्हणाले, लोकशाहीमध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला कुठल्याही राज्यात रोजगार मिळवण्याचा अधिकार आहे. बिहारी बेरोजगार त्यानुसार महाराष्ट्रात येत असतील तर त्यात गैर काय आहे? महाराष्ट्रातील युवक बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मोठय़ा प्रमाणात नोकरी-रोजगार करीत आहेत. तेथील त्यांना जनता सन्मानाची वागणूक देते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची महाआघाडी टिकणारी नाही, असेही ते म्हणाले. भाजप लोकसभा निवडणुकीच्या आधी देशभरातील १० कोटी लोकांशी संपर्क साधून संकल्पपत्र भरून घेणार आहे. विविध राज्यात पुढील ४० दिवस ३०० रथ फिरणार असून त्या माध्यमातून सरकारने पाच वर्षांत राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment