पुणतांब्यातील शेतक-यांच्या मुलींनी 6 दिवसांनंतर सोडले उपोषण

farmer
अहमदनगर – अखेर ६ दिवसांनंतर पुणतांब्यातील कृषीकन्यांनी आपले उपोषण सोडले आहे. कृषी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांच्या हस्ते नारळपाणी घेऊन त्यांनी उपोषण मागे घेतले. पण, कृषीकन्या शुभांगी जाधवने मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचा इशाराही दिला आहे.

काही खाल्याशिवाय डिस्चार्ज मिळणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते. आंदोलन पुढे न्यायचे असल्याने आम्ही उपोषण सोडले असले तरी आंदोलन मागे घेतलेले नाही. येत्या २ दिवसात चर्चा होऊन मागण्या मान्य न केल्यास पुन्हा उपोषण करणार असल्याचे शुभांगी जाधवने सांगितले.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, संपूर्ण कर्जमाफी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना मदत, कृषीसंलग्न वस्तुंवरील जीएसटीतून माफी, सुक्ष्मसिंचन, कृषी अवजारांवरांना शंभर टक्के अनुदान, शेतीमालाला हमीभाव, दुधाचे दर वाढून मिळावेत, अशा अनेक मागण्यांसाठी पुणतांब्यातील तीन मुलींनी अन्यत्याग आंदोलन सुरू केलं होतं. आज या आंदोलनाचा सहावा दिवस होता. शुक्रवारी पालकमंत्री राम शिंदे यांनी आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केली. मात्र ती निष्फळ ठरली होती.

Leave a Comment