कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला अंधश्रद्धेचे गालबोट

football
कोल्हापूर – संपूर्ण राज्यात कोल्हापूरची फुटबॉल प्रेमींची नगरी म्हणून ओळख आहे. जिद्द आणि मेहनतीने येथील खेळाडूंनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवल्याचा इतिहास आहे. पण आता अंधश्रद्धेचे गालबोट कोल्हापूरच्या या क्रीडा परंपरेला लागल्याची चर्चा सुरू आहे. फुटबॉलचा सामना कोल्हापूरच्या शाहू स्टेडियमवर सुरू असताना एका परदेशी खेळाडूने चक्क सॉक्समध्ये लिंबू घालून खेळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

शाहू स्टेडियमवर गेले काही दिवस झाले एक फुटबॉल चषक सुरू आहे. कोल्हापुरच्या पेठा-पेठांमधील संघ यामध्ये सहभागी होत असतात. यादरम्यान झालेल्या एका सामन्यात सॅनो पॅटस हा परदेशी खेळाडू सॉक्समध्ये लिंबू घालून खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोल्हापुरातील स्थानिक संघाकडून हा खेळाडू खेळत होता. सुरुवातीला हा नेमका काय प्रकार आहे हे कोणालाच समजले नाही. पण, त्याच्या सॉक्समध्ये लिंबू असल्याचे मैदानावरील प्रेक्षकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत पंचांना विचारणा केली.

कोल्हापूरच्या क्रीडा परंपरेला गालबोट लावणारा हा संपूर्ण प्रकार असल्याने तत्काळ त्या परदेशी खेळाडूला पंच सुनील पवार यांनी पिवळे कार्ड दाखवून बाहेर काढले. पण गेल्या काही महिन्यांपासून मैदानावर लिंबू घेऊन आलेला संघ जिंकत असल्याची अंधश्रद्धा येथे रूढ झाली असून लिंबू प्रकार आज हा केवळ कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण राज्यात गाजत आहे.

मेहनत आणि उत्तम आरोग्याची गरज क्रीडासह कोणत्याही क्षेत्रात विजय मिळवण्यासाठी असते. कोणतेही लिंबू यासाठी कामी येत नाही, हे अशा महाभाग खेळाडूंच्या संघाला कोण सांगणार? हाच प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रकाराबाबत संपूर्ण क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

Leave a Comment