राफेल करारावरुन शिवसेनेचा पुन्हा एकदा भाजपवर निशाणा

samna
मुंबई – शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर राफेल करारावरुन निशाणा साधला. देश जिवंत ठेवण्याचा ‘सत्यमेव जयते’ हाच मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील. सत्य बाके बडवून मरणार का?, असा सवाल भाजपला शिवसेनेने विचारला आहे.संरक्षण मंत्रालयाला राफेलच्या नव्या कराराच्या प्रक्रियेत डावलून पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या हस्तक्षेपाला संरक्षण मंत्रालयाने तीव्र आक्षेप घेतला होता, असे वृत्त शुक्रवारी प्रकाशित झाले होते. शिवसेनेने या पार्श्वभूमीवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधला.

गुरुवारी संसदेत पंतप्रधान मोदी यांनी देशभक्तीवर भाषण केले. राफेलचे समर्थन केले. राफेल प्रकरणातील ‘काळे पान’ दुसऱ्याच दिवशी समोर आले. त्यामुळे बाके वाजवून देशभक्तीचे नारे देणार्‍यांची तोंडे बंद झाली. मोदींच्या राफेल प्रकरणातील ‘सहभागा’चा एक नवा दस्तऐवज बाहेर पडला आहे. राहुल गांधी यांनी यानिमित्ताने केलेल्या आरोपांचे काय? उगाच विरोधकांना दोष का देता? देश जिवंत ठेवण्याचा ‘सत्यमेव जयते’ हाच मंत्र आहे. विरोधक मारले जातील, पण सत्य जिवंत राहील, असे शिवसेनेने म्हटले आहे.

लष्कराचे बळकटीकरण काँग्रेसला नको आहे असे नेहमीचेच आरोप पंतप्रधान करतात व दुसर्‍याच दिवशी राफेल करारात मोदी यांना व्यक्तिगत रस किती टोकाचा होता याबाबतचे कागदोपत्री पुरावे उघड होतात, यास काय म्हणायचे? हवाई दलाच्या बळकटीकरणासाठी राफेल करार हा झाला की एका गाळात बुडालेल्या उद्योगपतीच्या बळकटीकरणासाठी झाला? पंतप्रधानांकडून या प्रश्नाचे उत्तर अपेक्षित असल्याचे शिवसेनेने अग्रलेखात नमूद केले.

सत्ताधारी पक्षाची लोकशाही व न्याय व्यवस्थेची बूज राखण्याची जबाबदारी असते. प्रश्न विचारण्याचा अधिकार विरोधकांना आहे व हा अधिकार नाकारणे म्हणजे लोकशाहीचे खच्चीकरण आहे. देशावर साडेचार वर्षांपासून मोदींचे एकछत्री राज्य आहे. तरीही काँग्रेसवर महागाईपासून भ्रष्टाचारापर्यंत प्रत्येक गोष्टीचे खापर फोडणे हे स्वतःचे अपयश झाकण्यासारखे असल्याची टीका शिवसेनेने केली आहे.

Leave a Comment