या मंदिरात सीताफळाचे झाड करते मनोकामना पूर्ण

chandramukhi
भारतात रामाची मंदिरे जागोजागी दिसतात. बहुतेक ठिकाणी रामराया सीतामाई आणि बंधू लक्ष्मण याच्यासह विराजमान झाले आहेत. मात्र छत्तीसगड मधील चंद्रखुरी येथे असलेले एक मंदिर याला अपवाद असून येथे राम बालस्वरुपात आई कौसल्या हिच्या कुशीत विराजले आहेत. देशात या प्रकारचे हे एकमेव मंदिर आहे. अवतीभोवती सात तलावांनी घेरलेल्या जलसेन तलावातील एका बेटावर हे मंदिर आहे.

या मंदिरात कौसल्या, बाल स्वरूपातील राम यांच्याबरोबर शिव आणि नंदी आहेत. या मंदिरात एक सीताफळाचे झाड असून त्याला नवसाचे झाड असे म्हणतात. भाविक त्यांची जी इच्छा असेल ती एका चिठ्ठीवर लिहून नाव घालून नारळासह या झाडाला बांधतात. श्रद्धेने व्यक्त केलेली इच्छा नक्की पूर्ण होते असे सांगितले जाते. या झाडाखाली सुषेण वैद्य याची समाधी आहे.

पौराणिक कथेनुसार सुषेण हा रावणाचा राजवैद्य होता. रामायणानुसार जेव्हा युद्धात लक्ष्मण बेशुद्ध झाला तेव्हा याच सुशेणाने संजीवनी बुटी आणायला लावून लक्ष्मणाला शुद्धीवर आणले होते. रावणाच्या मृत्युनंतर तो रामासह अयोध्येला आला मात्र त्याचा मृत्यू चंद्रखुरी येथे या झाडाखाली झाला. तेथे त्याची समाधी आहे.

Leave a Comment