३१ मार्चनंतर जवळपास १९ कोटी लोकांचे पॅनकार्ड रद्द होण्याची शक्यता

income-tax
नवी दिल्ली – ३१ मार्चपर्यंत पॅनकार्ड आधार कार्डांशी लिंक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण, ५० टक्के पॅन धारकांनी आत्तापर्यंत पॅन कार्ड आधारबरोबर संलग्न केले नसल्यामुळे जवळपास १९ कोटी लोकांचे पॅनकार्ड रद्द होण्याची शक्यता असल्याची माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष सुशील चंद्रा यांनी दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने पॅन आणि आधारकार्ड प्रकरणावर सुनावणी करताना पॅनकार्ड आधारशी लिंक करणे अनिवार्य असल्याचे सांगितले होते. ३१ मार्च ही त्यासाठी शेवटची तारीख न्यायालयाने दिली होती. पण ४२ कोटी पॅनकार्ड धारकांपैकी केवळ २३ कोटी लोकांनीच पॅनकार्ड आधार कार्डाशी जोडले असल्याची माहिती सुशील चंद्रा यांनी दिल्यामुळे १९ कोटी लोकांचे पॅनकार्ड ३१ मार्चनंतर रद्द केले जाऊ शकतात.

खोटे पॅनकार्ड ओळखण्यास संलग्नीत करण्याच्या प्रक्रीयेमुळे मदत होईल, असा दावा सुशील चंद्रा यांनी केला आहे. आधारशी जे पॅनकार्ड संलग्न होणार नाहीत ते रद्द करण्यात येतील, असेही ते म्हणाले. पॅनकार्ड आधारशी लिंक झाल्यामुळे तो आपोआपच बँक खात्याशी जोडला जाईल. त्यामुळे प्राप्तीकर विभागाला खर्चाचा तपशील तपासण्यास मदत होणार आहे.

आधार कार्डशी समाज कल्याण विभागाच्या अनेक योजना जोडल्या गेल्या आहेत. आधारशी पॅनकार्डही संलग्न झाले तर विविध संस्थांना याचा सरळ लाभ मिळेल. यावर्षी जवळपास ६.३१ कोटी प्राप्तीकराचा भरणा करण्यात आला आहे. तर, ९५ कोटी नवे करदाते समोर आले आहेत.

Leave a Comment