राफेलप्रकरणी मोदींवर केलेले आरोप बिनबुडाचे नव्हते – राहुल गांधी

rafel
नवी दिल्ली – राफेलप्रकरणी मोदींवर आम्ही केलेले आरोप खरे ठरले असून फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांदे यांनी नरेंद्र मोदी माझ्याकडे आले आणि त्यांनी मला एचएएलला बाजूला करून अनिल अंबानींनाच हे कंत्राट द्यावे, असे स्पष्ट सांगितल्याचे म्हटले. ही बाब मला स्वतः हॉलांदे यांनी सांगितली. त्यामुळे चौकीदारच चोर असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत केला.

अनिल अंबानींचे नाव पंतप्रधान कार्यालयाकडून सुचवण्यात आले. सरकारने सर्वोच्च न्यायालयाला चुकीची माहिती दिली. न्यायालयाने त्या माहितीच्या आधारे निर्णय दिला. पण न्यायालयापासून खरी माहिती लपवण्यात आली. संरक्षण मंत्री सीतारामनही संसदेत खोटेच बोलल्या, असे आरोपही राहुल यांनी केले. काँग्रेसकडून या प्रकरणी पकडा गया मोदी (#PakdaGayaModi) हा हॅशटॅग चालविण्यात येत आहे.

देशातील तरुणांना, लष्करातील प्रत्येकाला मी सांगू इच्छितो की, राफेल घोटळ्यात पंतप्रधान मोदींचा थेट सहभाग आहे. देशाच्या भविष्याचा हा प्रश्न आहे. भारतीयांचे ३० हजार कोटी पंतप्रधानांनी चोरले आहेत. त्यांनी हा सर्व पैसा त्यांचे मित्र उद्योगपती अनिल अंबानींना दिला आहे. संरक्षण खात्याच्या व्यवहाराची प्रक्रिया बाजूला सारत त्यांनी हा घोटाळा केला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी काँग्रेस पुन्हा एकदा संयुक्त संसदीय समितीच्या मागणीवर ठाम आहे. संरक्षण खात्याचा फ्रान्स सरकारशी व्यवहार सुरू असतानाच मोदींचाही दुसऱ्या बाजूला समांतर व्यवहार सुरू होता, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तसेच, त्यांनी या पत्रकार परिषदेत संरक्षण मंत्रालयाने हे घडल्याचे स्वतः सांगितले आहे, असेही म्हटले आहे.

याचा उल्लेख संरक्षण खात्याने पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेल्या एका पत्रात केला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून समांतरपणे चर्चा केल्या जात आहेत. यामुळे संरक्षण खात्याकडून सुरू असलेली व्यवहार प्रक्रिया कमकुवत झाली आहे. आम्ही या व्यवहारासाठी नेमलेल्या पथकाचा भाग नसलेल्या मात्र, समांतररीत्या चर्चा करणाऱ्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो की, त्यांनी अशा प्रकारे फ्रान्सच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करू नये. पंतप्रधान कार्यालय संरक्षण मंत्रालयाने केलेल्या व्यवहारावर संतुष्ट नसेल, तर त्यांनी तसे कळवावे, असे संरक्षण मंत्रालयाचे पंतप्रधान कार्यालयाला पाठविलेले पत्र समोर आले आहे, असे राहुल यांनी म्हटले आहे.

विविध काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर येत आहेत. टीएमसीचे खासदार सौगाता रॉय यांनी भाजप संरक्षण विभागाचा कणा मोडण्याच्या प्रयत्नात आहे, असे म्हटले आहे. तसेच, राफेल मुद्दा आणि राहुल यांनी उल्लेख केलेल्या पत्रावरून लोकसभेत खडाजंगी सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी राफेल प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी केली आहे.

Leave a Comment