राजीव कुमार यांना सीबीआय न्यायालयासमोर हजर होण्याचे आदेश

rajiv-kumar
नवी दिल्ली – शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी कोलकात्याचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना सीबीआय न्यायालयाने ९ फेब्रुवारीला केंद्रीय अन्वेषण विभागासमोर (सीबीआय) चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहे. याच प्रकरणावरुन यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीबीआय विरोधात धरणे आंदोलन केले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यानंतर कुमार यांना सीबीआय चौकशीला समोरे जाण्याचे आदेश दिले.

राजीव कुमार यांच्यावर सीबीआयने शारदा चिटफंड प्रकरणाचा तपास करताना अनेक कागदपत्रे गहाळ केल्याचा ठपका ठेवला आहे. सीबीआयने या प्रकरणावरुन ३ फेब्रुवारीला कोलकात्याचे पोलीस आयुक्त यांचे घर गाठले. पण सीबीआय अधिकाऱ्यांनाच चक्क पोलिसांनी कोंडले होते. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी ही कारवाई बेकायदेशीर असल्याचे म्हणत सीबीआय अधिकाऱ्यांना चौकशीची परवानगी नाकारली होती.

सीबीआयने शारदा चिटफंड प्रकरणावर चौकशी करु द्यावी यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. त्यावेळी न्यायालयाने राजीव कुमार यांना अटक न करता चौकशी करावी, असे आदेश दिले होते. ही चौकशी शिलाँग येथील सीबीआय कार्यालयात होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment