बीडमधील बहुचर्चित गर्भपात प्रकरणातील मुंडे दाम्पत्याला १० वर्षांची शिक्षा

sudam-munde
बीड – बीड न्यायायालयाने परळीतल्या बेकायदेशीर गर्भपात आणि स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील आरोपींना दोषी ठरवले असून डॉक्टर दाम्पत्यासह मृत महिलेच्या पतीला या प्रकरणात न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. परळीत सुदाम मुंडेच्या रुग्णालयात मे २०१२ मध्ये विजयमाला पाटेकर या महिलेचा गर्भपात करताना मृत्यू झाला होता.

परळीत महिलेचा मृत्यू बेकायदेशीर गर्भपात करताना झाला होता. ही घटना मे २०१२ साली घडली होती. या प्रकरणी कलम ३०४, ३१२, ३१४, ३१५ आणि ३१६ नुसार गुन्हा दाखल झाला होता. यात पीसीपीएनडीटी आणि एमटीबी अॅक्ट सेक्शन ३ A, सेक्शन ९, सेक्शन १७, सेक्शन २९ नुसार गुन्हा दाखल झाला होता. याचबरोबर एमटीबी कायद्यानुसार सेक्शन ४ व ६ अन्वये गुन्हा या बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या मुंडे डॉक्टर दाम्पत्यावर दाखल झाला होता.

एकूण १७ आरोपी या प्रकरणामध्ये होते. त्यातल्या जळगावच्या डॉ. राहुल कोल्हे यांचे अपघाती निधन झाले होते. इतर दोघांचाही दरम्यानच्या काळात मृत्यू झाला होता. या प्रकरणी उर्वरित ११ जणांना न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह डॉक्टर दाम्पत्याला न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. सध्या मृत महिलेचा पती आरोपी महादेव पाटेकर हा फरार आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश ए . एस . गांधी यांनी ही शिक्षा ठोठावली आहे.

शवविच्छेदन करणारे डॉ. पी. आय. गाडेकर तसेच सरकारी पंचाची साक्ष या प्रकरणी महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षाकडून युक्तिवाद करणाऱ्या अॅड. मिलिंद वाघीरकर यांनी आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा द्यावी, अशी मागणी केली होती. यानुसार न्यायालयाने आरोपी सुदाम मुंडे, सरस्वती मुंडे तसेच फरार आरोपी महादेव पाटेकर या तिघांना १० वर्षांची शिक्षा व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

Leave a Comment