भाजपच्या तिकिटावर हरयाणातून निवडणूक लढविणार सेहवाग ?

virendra-sehwag
नवी दिल्ली: राजकारणाच्या मैदानात भारतीय संघाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग उतरण्याची शक्यता असून सेहवाग आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून राजकीय इनिंग सुरू करू शकतो. सेहवागला रोहतक मतदारसंघातून राजकीय आखाड्यात उतरवण्याचा भाजपचा विचार आहे. भाजपच्या कोअर कमिटीची रविवारी बैठक झाली. सेहवागच्या नावाची चर्चा त्यावेळी झाल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली.

काँग्रेसचे दिग्गज नेते दीपेंद्र सिंह हुड्डा यांचे रोहतकमध्ये वर्चस्व असल्यामुळेच सेहवागला या मतदारसंघातून राजकीय मैदानात उतरवले जाऊ शकते. पण अद्याप असा कोणताही विचार नसल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी म्हटले. अद्याप पक्षात सेहवाग सहभागीदेखील झाले नसल्याचे ते म्हणाले. तर दुसरीकडे भाजपतील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने लोकसभेच्या तिकीटाची ऑफर सेहवागला देण्याची जबाबदारी घेतली आहे. ही व्यक्ती दिल्ली आणि एनसीआरमधील राजकारणात अतिशय सक्रीय असल्याचे बोलले जाते. यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ नेत्याने ही माहिती दिली आहे. सेहवाग आता याबद्दल नेमका काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरेल.

Leave a Comment