पहिल्या दलित महामंडलेश्‍वरकडून घेतली दलित मुलाने दीक्षा

dalit-mahamandleshwar
उत्तर प्रदेशात सुरू असलेल्या प्रयागराज कुंभमेळ्यात पहिल्या दलित महामंडलेश्‍वरकडून दलित मुलाने संन्यासाची दीक्षा घेतली आहे. दलित महामंडलेश्‍वराकडून दीक्षा घेणारे ते पहिले दलित बालक असल्याचे सांगितले जात आहे.

अमन रावत असे या मुलाचे नाव असून तो 10 वर्षांचा आहे. तो आजमगढ येथील राहणारा आहे. सोमवारी त्याने मुंडन करून आणि वैदिक मंत्रोच्‍चार करून भगवी वस्त्रे धारण केली. आता अमतेश्‍वर असे या मुलाचे नाव असणार आहे.

महामंडलेश्‍वर कन्‍हैया प्रभुनंद गिरिजी महाराज यांच्यासह पाच गुरुंच्या मार्गदर्शनाखाली अमतेश्‍वर याने ब्रह्मचर्याचा मार्ग स्वीकारला. त्याच्या दीक्षेचा कार्यक्रम सुमारे तीन तास चालला.

‘माझ्या गुरुजीप्रमाणे महान आध्‍यात्मिक गुरु होण्याची माझी इच्छा आहे. मी माझ्या आईवडिलांसोबतच राहणार आहे, मात्र मी एक महान संत बनेल. याचसाठी मी त्यांच्या संरक्षणात आलो आहे,’ असे त्याने सांगितले.

अमतेश्‍वर हा दीक्षा घेण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून तयारी करत होता. आता तो मंत्र शिकत असून कन्‍हैया प्रभुनंद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पूजा करून घेत आहे. ‘आम्ही दीक्षा दिली तेव्हा अमनचे नवे नाव अमतेश्‍वर ठेवले. आमच्या जातीत कोणीही धर्मगुरू नाही. संत रविदास यांच्यानंतर कोणीही महामंडलेश्‍वर झालेला नाही,’ असे महामंडलेश्‍वर कन्‍हैया प्रभुनंद गिरिजी महाराज यांनी सांगितले.

Leave a Comment