हिमालयातील एक तृतीयांश हिमनद्या वितळण्याच्या बेतात

himalay
सध्याच्या हवामान बदलावर नियंत्रण मिळविण्यात मानवाला यश आले, तरी हिमालयातील सुमारे एक तृतीयांश हिमनद्या वाचविणे अवघड आहे, असे एका ताज्या संशोधनातून समोर आले आहे. या नद्या सुमारे 1.9 अब्ज लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचा स्रोत असून या शतकाच्या शेवटपर्यंत त्या नष्ट होतील, असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

हिंदूकुश हिमालय अॅसेसमेंट नावाच्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माऊंटेन डेव्हलपमेंट या काठमांडूतील संस्थेने हे संशोधन केले आहे. हवामान बदलावर नियंत्रण मिळविण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही तर या हिमनद्यांवर आणखी वाईट परिणाम होईल. त्या परिस्थितीत सन 2100 येईपर्यंत दोन तृतीयांश हिमनद्या वितळतील, असे या अहवालात म्हटले आहे.

“जागतिक तपमानवाढीमुळे या हिमनद्यांनी झाकलेल्या पर्वत शिखरांच्या वितळण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही पर्वतरांग आठ देशांत पसरलेली असून एका शतकाच्या आत हे पर्वत उघडे पडतील,” असे या संशोधनाचे नेतृत्व करणारे फिलिपस वेस्टर यांनी सांगितले.

हे संशोधन पाच वर्षे सुरू होते आणि त्यातून हिंदू कुश भागातील हवामान बदलाचे परिणाम जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, नेपाळ, चीन, भूतान, बांगलादेश आणि म्यानमार या आठ देशांत हा प्रदेश आहे. सिंधू, गंगा, यांग्सी, इरावदी आणि मेकाँग (ब्रह्मपुत्रा) या नद्यांमध्ये या हिमनद्यांतून पाणी येते.

Leave a Comment