मागील वर्षात देशातील 162 लोकांना सुनावण्यात आली फाशीची शिक्षा

hang
नवी दिल्ली – मागील वर्षात म्हणजेच 2018 साली देशातील 162 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा गेल्या 20 वर्षातील सर्वाधिक असून सर्वाधिक मध्य प्रदेशमधील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महाराष्ट्राचा यामध्ये दुसरा तर कर्नाटकचा तिसरा क्रमांक लागतो.

याबाबतची आकडेवारी दिल्लीतील राष्ट्रीय कायदा विद्यापीठाने एका अभ्यासाअंतर्गत जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशमधील 22 आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. यामध्ये बहुतांश आरोपींवर लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल आहे. गेल्या वर्षी मध्य प्रदेश सरकारने 12 वर्षाखालील मुलींवर बलात्कार करणार्‍यास फाशीच्या शिक्षेची तरतूद केली होती.

गेल्या वर्षी महाराष्ट्रात 16 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर कर्नाटकचा आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. दोन्ही राज्यात प्रत्येकी 15 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2018 या वर्षभरात सर्वोच्च न्यायालयाने 11 प्रकरणात दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.

2012 साली राजधानी दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने त्यापूर्वी त्यांना फाशीची शिक्षा दिली होती. ज्या ज्या राज्यांनी गेल्या वर्षी आरोपींना फाशीची शिक्षा नाही दिली त्यामध्ये ईशान्येकडील सहा राज्यांचा समावेश आहे. याआधी 2007 मध्ये भारतामध्ये 100 लोकांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर 2017 मध्ये 109 जणांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती.

Leave a Comment