संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) प्रदेशाध्यक्ष पदी कामगार नेते शशांक राव वर्णी

shashank-rao
मुंबई – संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी बेस्ट कामगारांचा ९ दिवस संप यशस्वी करून दाखविल्यावर चर्चेत आलेले कामगार नेते शशांक राव यांची वर्णी लागली आहे. एप्रिल २०१७ मध्ये शशांक राव यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता.

महाराष्ट्रात आगामी निवडणुकीपूर्वी जेडीयूचा विस्तार करण्यासाठी शशांक राव यांना महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचे बोलले जात आहे. शशांक राव पालिका, बेस्ट, रिक्षा टॅक्सी आणि फेरीवाले यांसारख्या अनेक संघटनांचे अध्यक्ष असल्यामुळे जेडीयूचा राज्यात विस्तार करण्यासाठी राव यांना पुढे केले आहे.

शिवसेनेच्या बेस्ट संघटनेने बेस्ट संप काळात पहिल्याच दिवशी संपातून माघार घेतल्यानंतर राव यांनी सलग आठ दिवस शिवसेनेला टक्कर दिली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच जेडीयूचे उपाध्यक्ष व राजनितीकार किशोर प्रशांत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावरून एकूणच राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

मी जेडीयूत २०१७ला प्रवेश केल्यानंतर मुंबईचे अध्यक्षपद भूषवले. माझी लहानपणापासून जडणघडण समाजवादी विचारसरणीत झाली आहे. यापुढे समाजवादी विचारसरणीच्या लोकांना एकत्र करून जेडीयूच राज्यातील स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया जेडीयूचे नवनिर्वाचित महाराष्ट्र अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.

Leave a Comment