चेन्नईमध्ये सुरु झाले देशातील पहिले रोबो हॉटेल

robot
एखाद्या हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर आपल्या सेवेसाठी वेटर उपलब्ध असतात. हे वेटर आपली ऑर्डर घेण्यापासून ती वाढण्यापर्यंत आणि त्यानंतर आपले बील देण्यासाठी तत्पर असतात. पण आता एखाद्या व्यक्तीऐवजी ही सेवा तुम्हाला एखाद्या रोबोटने दिली तर? सध्याच्या घडीला अशक्य असे काहीच नाही. हे सर्वकाही प्रगत तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे आणि तंत्रज्ञानात आपला देशाही काही मागे नाही. नुकतेच चेन्नईमध्ये अशाप्रकारच्या रोबो वेटर हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले आहे.

याठिकाणी रिसेप्शनिस्टही रोबो असल्यामुळे अॅडमिनच्या कामापासून ऑर्डर घेणे आणि प्रत्यक्ष पदार्थ टेबलवर पोहोचवणे अशी सगळी कामे याठिकाणी हे रोबो करणार आहेत. चेन्नईमधील या हॉटेलच्या मालकाची ही दुसरी शाखा असेल. त्यांनी याआधी कोईम्बतूर येथे अशाचप्रकारे एक हॉटेल सुरु केले होते. तर मुगलीवक्कम परोरमध्ये आताची शाखा सुरु करण्यात आली आहे. या हॉटेल्समधील रिसेप्शनिस्ट आणि इतर रोबो इंग्रजी आणि तामीळ भाषेमध्ये संवाद साधतो.

एकूण आठ रोबो मुगलीवक्कम पोररमधील हॉटेलमध्ये आहेत. ज्यामध्ये ७ रोबो वेटर आणि एक रिसेप्शनिस्ट आहे. या रोबोची नावे अजून ठेवण्यात आली नाहीत. पण या वेटर रोबोंची नावे गिऱ्हाईकांच्या सल्ल्याने ठेवण्यात येणार असल्याचे मालकाने सांगितले. एक टॅब हॉटेलच्या टेबलवर ठेवण्यात आला आहे. या टॅबद्वारे गिऱ्हाईक आपल्याला हवे असलेले पदार्थ ऑर्डर करु शकतात. गिऱ्हाईकांनी सिलेक्ट केलेली ऑर्डर थेट किचनमध्ये जाते आणि किचनमधून ऑर्डर घेऊन रोबो त्या अचूक टेबलवर पोहोचवतो. सध्या हे रोबो वेटर हॉटेल जोरदार चर्चेत असून ग्राहकांमध्ये त्याबाबत उत्सुकता दिसून येत आहे.

Leave a Comment