निवडणुकांदरम्यान व्हॉट्सअॅप बंद करणार ‘त्यांचे’ अकाउंट

whatsapp
नवी दिल्ली : लवकरच फेसबुकची मालकी असलेल्या ‘व्हॉट्सअॅप’ या मेसेजिंग अॅपवरील खोटे आणि असभ्य अकाऊंट डिलीट करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीतर्फे देण्यात आली असून 2 मिलीअन म्हणजेच 20 लाख अकाउंट्स या अंतर्गत दर महिन्याला बंद करण्यात येणार आहे.

राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकींच्या प्रचारासाठी अनेक प्रकारच्या साधनांचा वापर करतात, त्यापैकीच एक म्हणजे सोशल मीडिया. पक्षाचा फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून प्रचार आणि विरोधी पक्षांचा अपप्रचार केला जातो. व्हॉट्सअॅपचा राजकीय पक्षांकडून दुरुपयोग झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली असल्याचेही व्हॉट्सअॅपने सांगितले. राजकीय पक्षांशी याबाबत बातचीत सुरु असून, ते जर अशाचप्रकारे व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग करत राहिले तर लवकरच त्यांचे अकाऊंट बंद करण्यात येणार असल्याचे व्हॉट्सअॅपने स्पष्ट केले.

माध्यमांना व्हॉट्सअॅपचे प्रसारण प्रमुख कार्ल वुग यांनी सांगितले की, व्हॉट्सअॅपचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न अनेक राजकीय पक्ष करतात, जे चुकीचे आहे. आम्ही त्यांचे व्हॉट्सअॅप अशा परिस्थितीत बंद करु शकतो.निवडणुकांमध्ये व्हॉट्सअॅपचा चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे, हे आम्हाला माहित आहे. आम्ही त्यांचा शोध घेऊन त्यांना थांबवण्यासाठी काम करत आहोत, असेही कार्ल वुग यांनी स्पष्ट केले.

Leave a Comment