सव्वा महिना शाकाहारी व्हा आणि 10 लाख डॉलर मिळवा – पोप फ्रान्सिसना आव्हान

pope-francis
ख्रिस्ती धर्मातील लेंटच्या काळात सव्वा महिना शाकाहारी व्हा आणि 10 लाख डॉलर मिळवा, असे आव्हान कॅथोलिक पंथाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिसना देण्यात आले. पर्यावरण चळवळीतील एका गटाने हे आव्हान दिले असून ही रक्कम फ्रान्सिस यांच्या पसंतीच्या धर्मादाय संस्थेला देण्यात येणार आहे.

जेनेसिस बटलर ही 12 वर्षीय अमेरिकी पशु अधिकार कार्यकर्ती आणि मिलियन डॉलर व्हेगन या संस्थेने मिळून पोप यांच्या नावे एक खुला पत्र प्रसिद्ध केले आहे. जगभरातील वृत्तपत्रांमध्ये हे पत्र प्रकाशित करण्यात आले आहे.

“हवामान बदल, परिवासाची हानी आणि प्रदूषणाबद्दल बोलण्याबद्दल तसेच पृथ्वी ही आपल्या सर्वांचे घर आहे, याची आठवण करून देण्याबद्दल मी आज तुम्हाला अत्यंत सन्मान आणि आदराने लिहीत आहे, ” असे बटलर याने म्हटले आहे. पोप फ्रान्सिस हे हवामान बदलाबाबत उघडपणे बोलण्यासाठी ओळखले जातात.

शाकाहार हा एखाद्याचा पर्यावरणावरील प्रभाव कमी करण्याच्या सर्वात परिणामकारक पद्धतींपैकी एक आहे, असे संशोधनातून समोर आले आहे. पशुपालन हे जगातील 14.5% हरितगृह वायू उत्सर्जनासाठी जबाबदार आहे. पशुजन्य उत्पादनांसाठी सुमारे 83% शेतजमीन लागते, परंतु त्यातून आपल्याला फक्त 18%कॅलरी मिळतात, याकडे जेनेसिसने लक्ष वेधले आहे.

या वर्षी लेंटचा 6 मार्चपासून सुरू होतो आणि 18 एप्रिलपर्यंत आहे. पोप फ्रान्सिसने जेनेसिसचे आव्हान स्वीकारल्यास ब्ल्यू होरिजॉन इंटरनॅशनल फाऊंडेशन ही संस्था पोपनी निवडलेल्या संस्थेला 10 लाख डॉलर देणार आहे, असे सीएनएन वाहिनीने म्हटले आहे.

Leave a Comment