मी अध्यक्ष झाल्यामुळेच टळले उत्तर कोरियाशी मोठे युद्ध : ट्रम्प

donald-trump
मी अध्यक्ष झाल्यामुळेच उत्तर कोरियाशी मोठे युद्ध टळले, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांच्याशी येत्या महिन्यात व्हिएतनाममध्ये बैठक करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

बुधवारी रात्री संसदेसमोर ट्रम्प यांचे वार्षिक ‘स्टेट ऑफ द यूनियन’ भाषण झाले. त्यावेळी त्यांनी हा दावा केला. ‘‘मी जर अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून निवडून आलो नसतो, तर मला वाटते, की आपण आता उत्तर कोरियाशी एका मोठ्या युद्धाच्या स्थितीत असतो,’’ असे यावेळी ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प आणि किम यांच्यात गेल्या वर्षी पहिली शिखर बैठक सिंगापुर येथे झाली होती. त्यानंतर त्यांच्यातील दुसऱ्या बैठकीचे नियोजन सुरू झाले होते. या बैठकीनंतरच उत्तर कोरियाने आण्विक अस्त्र किंवा बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या चाचणीसारखे कृत्य केलेले नाही, मात्र उ. कोरियाने अद्याप आपला अण्वस्त्रांचा कार्यक्रम रद्द करण्याची तयारी दाखवलेली नाही.

ट्रम्प यांनी 2017 मध्ये उत्तर कोरियाशी युद्ध करण्याची धमकी देऊन भय निर्माण केले होते. मी या देशावर अशी आग ओकेल की जगाने ती कधीही पाहिलेली नसेल, असे तेव्हा त्यांनी म्हटले होते. तसेच या दोन नेत्यांमधील वाग्युद्धही गाजले होते.

Leave a Comment