काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढणार रामायण फेम अरुण गोविल ?

arun-gowil
नवी दिल्ली – लवकरच आपल्याला राजकारणाच्या मैदानात रामानंद सागर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रामायण’ मालिकेत प्रभूरामचंद्रांची भूमिका साकारणारे अरुण गोविल दिसू शकतात. काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणूक ते लढवण्याची शक्यता आहे. इंदूरमधून अरुण गोविल यांना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या विरोधात उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा विचार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या कार्यालयातील सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

अरुण गोविल यांच्या नावाचा इंदूरच्या जागेसाठी काँग्रेसच्या बैठकीमध्ये विचार झाला. १५ वर्षानंतर मध्य प्रदेशात सत्ता मिळवणाऱ्या काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत २० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. भाजपचा इंदूर हा बालेकिल्ला असून या लोकसभा मतदारसंघातून सलग आठवेळा सुमित्रा महाजन विजयी झाल्या आहेत.

नेहमीच भाजपला भोपाळ आणि इंदूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांनी साथ दिली असून काँग्रेसला मागच्या तीस वर्षात येथे एकदाही लोकसभेची निवडणूक जिंकता आलेली नाही. अरुण गोविल यांनी ९० च्या दशकातील ‘रामायण’ या लोकप्रिय मालिकेत प्रभूरामचंद्रांची भूमिका साकारली होती. त्यांना इंदूरमध्ये उमेदवारी दिली तर ते गेमचेंजर ठरतील असे काँग्रेसच्या एका गटाला वाटते.

अरुण गोविल यांच्या नावाचा विचार झाला असून त्यांनी उमेदवारीसाठी अर्ज केला तर त्यावर गांभीर्याने विचार होईल असे प्रदेश काँग्रेसचे मीडिया सेलचे समन्वयक नरेंद्र सलुजा यांनी सांगितले. लोकसभेच्या उमेदवारीसाठी भोपाळमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी आधी करीना कपूर त्यानंतर प्रियंका गांधी यांच्या नावाचा आग्रह धरला होता.

Leave a Comment