प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत यावे – नवाब मलिक

nawab-malik
मुंबई – प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीच्या फंद्यात न पडता सध्याचे देशातील वातावरण पाहता काँग्रेस – राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत यावे, असे आवाहन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.

सध्याच्या घडीला देशभरात भाजपच्या विरोधात लहर असल्यामुळे अशा परिस्थितीत राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीसह इतर लहान पक्ष मिळून सेना-भाजपच्या विरोधात निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी वंचित आघाडीचा नवीन प्रयोग करु नये, त्यांनी आघाडीसोबत येण्याचे आवाहन मलिक यांनी केले आहे.

आपल्याला १२ जागा काँग्रेस देत नाही. तसेच आपण टाकलेल्या अटींवर सहमत होत नसल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात बहुजन वंचित आघाडी सर्व ४८ जागांवर निवडणुका लढवणार असल्याची घोषणा केली. त्यासोबतच आपल्या आघाडीचे उमेदवार राज्यात अनेक ठिकाणी घोषित केले. मलिक त्या पार्श्वभूमीवर म्हणाले की, ही वेळ आता राज्यात आणि देशात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बहुजन वंचित आघाडी आणि इतर सर्व लहान पक्ष मिळून एकत्र लढण्याची आहे. पण, अशा वेळेत प्रकाश आंबेडकरांनी नवीन काही प्रयोग करणे योग्य नसल्याचे मलिक म्हणाले.

राज्यातील महाआघाडीत प्रकाश आंबेडकरांनी यावे यासाठी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. तसेच त्यांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेही भेटलेले आहेत. त्यामुळे त्यांनी आघाडीत यावे. राज्यात आता सेना-भाजपच्या विरोधात प्रचंड मोठे वातावरण तयार झाले आहे. त्याचा फायदा आघाडीला होणार असल्याचे मलिक म्हणाले.

Leave a Comment