लोकप्रिय वाहिन्या नव्या केबल दराने पाहणे महागडे होणार – सर्वेक्षण

cable
मुंबई – ट्रायने पाहिजे तेवढ्याच प्रसारण वाहिन्या निवडून तेवढेच शुल्क भरण्याची सुविधा लागू केली असून १ फेब्रुवारीपासून या निर्णयाची प्रसारण वाहिन्यांनी अंमलबजावणी सुरू केली. लोकप्रिय अशा प्रसारण वाहिन्यांचाच या निर्णयामुळे बहुतांश फायदा होणार आहे. पण अशा वाहिन्यांसाठी नागरिकांना जास्त शुल्क भरावे लागणार असल्याचे क्रिसील या पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.

पारदर्शकता आणि प्रसारण वाहिन्यांच्या दरात एकसुत्रता आणण्यासाठी ट्रायने प्रसारण वाहिन्यांसाठी दराचे नवे नियम लागू केले. प्रेक्षकांना नव्या केबल दराने हव्या त्या प्रसारण वाहिन्या निवडूण तेवढचे शुल्क भरण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. क्रिसीलने याबाबत नव्या मासिक केबल दराचे विश्लेषण केले आहे. यानुसार २५ टक्के वाढ केबलच्या मासिक दरात होणार आहे. उदाहरणार्थ प्रेक्षक जर टॉपच्या १० प्रसारण वाहिन्यांसाठी २३० ते २४० रुपये मासिक बिल भरत असेल तर त्याला ३०० रुपये द्यावे लागणार आहे.

दर्जेदार आणि इतरांहून वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम प्रसारण वाहिन्यांना दाखवावे लागणार असल्याचे निरीक्षण क्रिसीलने नोंदविले आहे. प्रसारण वाहिन्यांच्या उत्पन्नात नव्या केबल दराने ४० टक्के वाढ होणार आहे. उदाहरणार्थ यापूर्वी प्रेक्षकांकडून त्यांना ६० ते ७० रुपये मिळत असतील तर त्यांना ९४ रुपये मिळणार आहेत. जास्तीत जास्त प्रेक्षकांकडून लोकप्रिय प्रसारण वाहिन्यांची मागणी होणार असल्याने त्यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. तर कमी लोकप्रिय असलेल्या प्रसारण वाहिन्यांना स्पर्धेत टिकणे कठीण होणार आहे. त्यामुळे डीटीएच आणि केबल ऑपरेटरला ट्रायच्या नियमाचा संमिश्र परिणाम दिसून येणार आहे.

Leave a Comment