पुण्यातील नामंकित वडापावाची विक्री थांबवण्याचे आदेश

vada-pav
पुणे – अन्न व औषध प्रशासनाकडून(एफडीए) पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर धडक कारवाई करण्यात आली आहे. एफडीएने ही कारवाई अस्वच्छ कामगार आणि किडक्या बटाट्याच्या वापरामुळे केली असून एफडीएतर्फे जनहित व जनआरोग्याच्या कारणास्तव विक्रीचा व्यवसाय तातडीने बंद करण्याबाबत आदेश दिल्याचे सांगण्यात आले आहे.

अन्न व औषध प्रशासनाकडून कॅम्पमधील गार्डन वडापावसह अख्तर केटरर्स व बागवान हॉटेलवरही कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासनाक़डून शहरात विनापरवाना, नोंदणीशिवाय हॉटेल, केटरर्स व वडापाव विक्री करणाऱ्यांवर कारवाईची मोहिम उघडण्यात आली आहे. गार्डन वडापावच्या बाबतीत स्पष्टपणे पावाच्या तपासणी अहवालाचा अभाव तसेच किडक्या बटाट्याचा वापर अशा कारणांचा समावेश आहे.

अन्न सुरक्षा व मानद कायदा २००६अंतर्गत तरतुदीनुसार बंधनकारक आहे. अन्न व औषध प्रशासनातर्फे या कायद्यात सांगितलेल्या तरतुदींचे उल्लंघन आढळून आल्यास कारवाई केली जाते. सोमवारी करण्यात आलेल्या कारवाईत बागबान रेस्टोरंट, अख्तर केटरर्स आणि गार्डन वडापाव सेंटरचा समावेश आहे. यात कामगारांची अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची अयोग्य साठवणूक, अस्वच्छता, विना परवाना व्यवसाय अशी कारणे देण्यात आली आहेत.

Leave a Comment